असित मोदी-जेनिफर मिस्त्री वाद चिघळला; निर्मात्याने जाहीर माफी मागावी अशी अभिनेत्रीची मागणी

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा (Tarak Mehta Ka Ooltah Chashma) निर्माता असित मोदी (Asit Modi) मोठ्या अडचणीत सापडला आहे. पोलिसांनी असित मोदी आणि ‘तारक मेहता’शी संबंधित इतर दोन लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. या शोमध्ये मिसेस सोधीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने असित मोदीवर लैंगिक छळाचा आरोप केला होता. अभिनेत्रीने असित मोदी तसेच ‘तारक मेहता’चे कार्यकारी निर्माते जतीन बजाज आणि ऑपरेशन्स हेड सोहेल रमाणी यांच्याविरोधात तक्रार केली होती आणि आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई पोलिसांनी असित मोदी, सोहेल रमाणी आणि जतिन बजाज यांच्याविरोधात कलम 354 आणि 509 नुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

दरम्यान जेनिफर मिस्त्री ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तिला असित मोदींकडून जाहीर माफी हवी आहे. त्यामुळे दोघांमधील वाद आणखीनच चिघळला आहे.

‘त्याने माझ्यावर अनेक गंभीर आणि खोटे आरोप केले आहेत. जर माझ्यामुळे इतका त्रास होता तर तू मला इतके दिवस सहन का केलेस? दिलकुश गेल्यानंतर मला शोमध्ये परत का आणले? मला त्यांच्याकडून जाहीर माफी हवी आहे, असे मी पहिल्या दिवसापासून म्हणत आहे. सोहेलने स्वतःच्याच विधानाचे खंडन का केले? सर्व प्रथम मी अपमानास्पद आहे, नंतर मी त्याची जवळची मैत्रीण आहे आणि मी त्याला आध्यात्मिक मदत केली आहे’, असे जेनिफर मिस्त्री (Jennifer Mistry) म्हणाली.