Muralidhar Mohol | ‘धावपट्टी विस्ताराची शक्यता तपासावी’, केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे संरक्षणमंत्र्यांना पत्र

Muralidhar Mohol | पुणे विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार होण्याची चिन्हे आहेत. पुण्याचे खासदार आणि केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ  यांनी याबाबत संरक्षणमंत्र्यांना पत्र लिहिले असून, संयुक्त सर्वेक्षण करण्यास परवानगी देऊन धावपट्टी विस्ताराची शक्यता तपासण्यासाठी भारतीय हवाई दलाला सूचना द्याव्यात, अशी विनंती पत्रात केली आहे. पुणे विमानतळाची सध्याची धावपट्टी भारतीय हवाई दलाच्या मालकीची असल्याने संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना हे पत्र पाठवण्यात आले आहे.

‘भारत सध्या जगातील तिसऱ्या क्रमांकाची देशांतर्गत नागरी विमान वाहतूक बाजारपेठ आहे. त्यातही पुणे विमानतळ हे प्रवाशांची वर्दळ असलेल्या व्यस्त विमानतळांच्या यादीत ९ व्या क्रमांकावर आहे. गेल्यावर्षी ८० लाखांहून अधिक प्रवाशांनी पुणे विमानतळावरून प्रवास केला. भविष्यात ही वाढ कायम राखण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांसह विमानतळाचा रन वे (धावपट्टी) वाढविण्याची आवश्यकता आहे व सध्याच्या धावपट्टीचा विस्तार करून हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो, असे या पत्रात अधोरेखित करण्यात आले आहे.

‘युरोपिय देश, अमेरिका, जपान या देशांशी थेट आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी उपलब्ध नसल्यामुळे शहराच्या वाढीवर त्याचागंभीर परिणाम होत असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच, महाकाय विमानांची (कोड डी/ई प्रकारची विमाने) हालचाल सुलभ करण्यासाठी सध्याच्या धावपट्टीचा विस्तार करण्याची गरज आहे. भारतीय हवाई दलाच्या मालकीच्या पुणे विमानतळाच्या सध्याच्या धावपट्टीचा विस्तार (Muralidhar Mohol) करून हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो. या विस्तारामुळे महाकाय (कोड-डी/ई प्रकारच्या) विमानांची हालचाल सुलभ होईल व आंतराष्ट्रीय विमानसेवा सुरू होऊ शकेल,’ असेही पत्रात म्हटले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप