महिला पत्रकारांना साडी घालण्याचा सल्ला देणाऱ्या सुप्रिया सुळे यांच्यावर चित्रा वाघ यांची घणाघाती टीका

मुंबई – शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी काही दिवसांपूर्वी टिकली लावली नसल्याने एका महिला पत्रकाराशी बोलण्यास नकार दिला होता. संभाजी भिडेंनी यावेळी केलेल्या विधानानंतर राज्यात मोठा वाद निर्माण झाला होता. दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चॅनेलमधील मुलींनी साडी नेसण्याबद्दल विधान केलं असून, त्यावर टीका होत आहे.

‘चॅनलमधल्या मुली साडी का नाही नेसत? शर्ट आणि ट्राऊजर का घालतात? मराठी भाषा बोलताना? मग मराठी संस्कृतीसारखे कपडे आपण का नाही घालत? आपण सगळ्या गोष्टींचं वेस्टर्नायझेशन करतोय’, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. दरम्यान, संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून आंदोलन करणारे आणि भिडे यांच्यावर टीकेची झोड उठवणारे आता नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्याचा भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी समाचार घेतला आहे. ‘टिकलीवर टीका करणारे साडीवर या नेत्यांना सोलणार का..? चला तुमची परीक्षा एकदा होऊन जाऊ द्या,’ असं ट्वीट चित्रा वाघ यांनी केलं आहे. यासोबतच चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याचा व्हिडिओदेखील शेअर केला आहे.