त्र्यंबकेश्वरमध्ये काहीही चुकीचं घडलेलं नाही, कुणीही बळजबरीनं घुसलं नाही; संजय राऊतांची प्रतिक्रिया

नाशिक – नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या चार जणांच्या विरोधात त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कथित घटने संदर्भात विशेष चौकशी पथकाद्वारे चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

त्यानंतर काल विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर, पोलीस अधीक्षक शहाजी उमप तसंच अन्य अधिकाऱ्यांनी देवस्थानच्या विश्वस्तांची बैठक घेतली आणि या प्रकरणाची माहिती घेतली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. 13 मे रोजी एका मिरवणुकीतील काही जणांनी मंदिरात घुसखोरीचा प्रयत्न केला होता, मात्र सुरक्षा रक्षकांनी तो रोखला होता, असा देवस्थानचा आरोप आहे.

दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या प्रकरणार वेगळी भूमिका मांडली असून महाराष्ट्रात हिंदुत्वाच्या नावाने टोळ्या निर्माण करायच्या आणि वातावरण दूषित करायचे असा कट मला दिसतो असल्याचे म्हटले आहे.

नाशिक दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातला सामाजिक सलोखा बिघडविण्याचा हा प्रयत्न आहे. नकली हिंदुत्वाच्या नावावर काही टोळ्या निर्माण करुन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न असून मला काही कट दिसत असल्याचे राऊत म्हणाले. ते पुढे म्हणाले की, आमचं हिंदुत्व कडवट असून नकली हिंदुत्व नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील मंदिरं ही आमची श्रद्धास्थानं असून आमच्यासाठी त्र्यंबकेश्वर हे सुद्धा श्रद्धास्थान आहे. त्यामुळे घटनेची माहिती घेतली असता तिथं कुणी घुसलं नसल्याचे ते म्हणाले.

संजय राऊत यावेळी म्हणाले की, मुस्लिम लोक संदलच्या दरम्यान तिथं पायरीवर धूप दाखवतात, आरती करतात. ही गेल्या अनेक वर्षांची परंपरा असून ती पूर्वापार चालत आलेली आहे. मुस्लिम दर्ग्यावर हिंदू लोकही जातात, हाजी अली, अजमेर अशा ठिकाणी हिंदू लोक जातात. रामनवमीला कधी दंगल झाली नव्हती, मग आता का? असा सवाल करत सरकारच्या पायाखालची जमीन हादरली असल्यानं हे होत असल्याची टीका राऊत यांनी केली. महाराष्ट्रात सामाजिक सलोखा राखला पाहिजे, पण सत्ताधारी सामाजिक सलोखा बिघडवत असल्याचे ते म्हणाले.