हिंदू महासंघाकडून त्र्यंबकेश्वराच्या प्रवेशद्वारावर शुद्धीकरण, हिंदू संघटना आक्रमक

नाशिक – नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या चार जणांच्या विरोधात त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कथित घटने संदर्भात विशेष चौकशी पथकाद्वारे चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

त्यानंतर काल विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर, पोलीस अधीक्षक शहाजी उमप तसंच अन्य अधिकाऱ्यांनी देवस्थानच्या विश्वस्तांची बैठक घेतली आणि या प्रकरणाची माहिती घेतली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. 13 मे रोजी एका मिरवणुकीतील काही जणांनी मंदिरात घुसखोरीचा प्रयत्न केला होता, मात्र सुरक्षा रक्षकांनी तो रोखला होता, असा देवस्थानचा आरोप आहे.

दरम्यान, त्र्यंबकेश्वर येथील घटना नंतर हिंदू महासंघ (Hindu Mahasangh) आक्रमक झाला असून आज (17 मे) सकाळी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या (Trimbakeshwar Mandir) प्रवेशद्वारावर शुद्धीकरण करण्यात येऊन पूजन करण्यात आले. यावेळी हिंदू महासंघासह अनेक हिंदू संघटनांकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी पुणे, नाशिक येथील हिंदू संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.