‘कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला नाही तर…’, राष्ट्रवादीच्या आमदाराचा फतवा

पुणे : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरवात झाली असल्याचे देखील टास्क फोर्सने सांगितले आहे. राज्यात देखील कोरोना रुग्ण वाढीत मोठी वाढ होत आहे. त्यामुळेच मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये सुरु झालेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्यापाठोपाठ पुण्यात देखील पहिली ते आठवीचे वर्ग बंद करण्यात येत असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात कोरोनास्थितीचा आढावा घेण्यात आला, त्यानंतर अजित पवार यांनी हा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे पुण्यात उद्यापासून मास्क न घातल्यास ५०० रुपये दंड आणि मास्क नसताना सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १००० रुपये दंड आकारण्याची सुचना देखील अजित पवार यांनी केली आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी मतदारसंघात वेगळाच फतवा काढला आहे. आमदार सुनील शेळके यांनी आपल्या मतदारसंघातील नागरिकांना कोरोना लस घेण्याचं आवाहन केलं आहे. मावळमध्ये कोरोना लसीचा पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या 100 टक्के असल्याचं सांगितलं जातंय. मात्र, कोरोना दुसरा डोसकडे मतदारसंघातील नागरिक पाठ फिरवत असल्याचं शेळके यांच्या निदर्शनास आलं. त्यामुळे कोरोना लसीचा दुसरा डोर घेतला नाही तर त्या व्यक्तीला क्वारंटाईन करणार असल्याचा इशारा शेळके यांनी दिलाय. यासाठी शेळके यांनी मतदारसंघातील नागरिकांना कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी 15 जानेवारीपर्यंतचा अल्टिमेटमही दिल्याची माहिती मिळत आहे.