“… ही तर लाज वाटण्यासारखी गोष्ट”, राज्यपालांनी अभिभाषण गुंडाळल्यानंतर आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका!

मुंबई : आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. 3 मार्च ते 25 मार्च या कालावधीत हे अधिवेशन होणार आहे. तर, 11 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी केली आहे. तसेच, सत्ताधारीही विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहेत.

राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात वादळी झाली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे आज पडसाद पाहायला मिळाले. कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांविषयी केलेल्या एका विधानाचा निषेध करण्यासाठी राज्यपालांच्या भाषणावेळी सत्ताधारी आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे राज्यपावांना अवघ्या दोन मिनिटांमध्ये आपलं भाषण आटोपतं घ्यावं लागलं.

दरम्यान, राज्यपालांनी अभिभाषण अर्ध्यातच सोडलं आणि त्यानंतर ते राजभवनाकडे रवाना झाले. मात्र त्यानंतरही सत्ताधाऱ्यांचा आक्रमक पवित्रा कायम होता. या पार्श्वभूमीवर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी घडलेल्या प्रकारावरून खंत व्यक्त केली आहे. “ही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. हा महाराष्ट्रचा अपमान झाला आहे. राज्यपालांनी असं निघून जाणे, त्यांच्या भाषणावेळी त्यांचा अपमान होणे हे सर्व अयोग्य आहे. आम्हाला या गोष्टींमुळे धक्का बसला आहे”, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले