‘वेदान्त’च्या मालकांची पोस्ट शेअर करत देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल; म्हणाले,… 

Mumbai – ‘वेदान्त’ कंपनीचे मालक अनिल अग्रवाल (Anil Agarwal) यांनी गुजरातला ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ (Vedanta Foxconn) कंपनीचा प्रकल्प उभारण्यासंदर्भातील आपल्या निर्णयाचं स्पष्टीकरण देताना भविष्यात महाराष्ट्रामध्येही यासंदर्भातील संलग्न प्रकल्पासाठी मोठी गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली.

ट्विटरवरुन अग्रवाल यांनी केलेल्या या घोषणेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Deputy CM Devendra Fadnavis) यावर प्रतिक्रिया नोंदवताना विरोधकांना विशेष करुन शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. अस्वस्थता आणि नकारात्मकतेवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी स्वतः कार्यक्षम होण्यावर आधी लक्ष केंद्रित करा असा खोचक सल्ला फडणवीस यांनी १ लाख ६६ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीवरुन टीका करणाऱ्या शिवसेनेला दिला आहे.

ते म्हणाले, वेदांता-फॉक्सकॉनच्या संलग्न प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार! महाराष्ट्रात गुंतवणूक यावी यासाठी आम्ही कायमच स्पर्धात्मक आणि व्यवसायपूरक राहू. मला खेद होतो की केवळ राजकीय स्वार्थीपणासाठी अतिशय चुकीचे, नकारात्मक आणि निराधार दावे केले जात आहेत. पण असे करून ते केवळ त्यांच्या अकार्यक्षमतेचेच प्रदर्शन करीत आहेत.

माझा या नेत्यांना प्रश्न आहे की, महाराष्ट्रात 3.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक रिफायनरीच्या माध्यमातून येत असताना त्याला विरोध कुणी केला, हा प्रकल्प कुणी लांबविला? स्वतः कार्यक्षम होण्यावर आधी लक्ष केंद्रीत करा, ना की अस्वस्थता आणि नकारात्मकतेवर ! असं फडणवीस यांनी म्हटले आहे.