‘मोदींचे नेतृत्व आणि योगींचे कर्तृत्व उत्तर प्रदेशला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतील’

मुंबई – उत्तर प्रदेशमध्ये १९८५ नंतर सलग दुसऱ्यांदा विजय मिळवणारा भारतीय जनता पार्टी हा आघाडीचा पक्ष ठरला आहे. त्यामुळे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि मुख्यमंत्री  योगी आदित्यनाथ जी यांच्या कुशल प्रशासनात झालेल्या निवडणुकीचा विजय ऐतिहासिक मानावा लागेल. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या मतदार संघात प्रचार करण्याची मला संधी मिळाली. त्यांना मिळणारे जनसमर्थन अभूतपूर्व असल्याची प्रतिक्रिया भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.

देशात झालेल्या पाच राज्यांतील निवडणुकांच्या निकालानंतर आ. चंद्रशेखर बावनकुळे पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रीय सत्तांतरणाचा पाया म्हणून उत्तर प्रदेशकडे बघितले जाते. उत्तर प्रदेशातील जनतेतेची योगी आदित्यनाथ यांच्यावर असीम श्रद्धा आहे. आगामी काळात ते राज्याच्या विकासाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतील. गेल्या पाच वर्षात उत्तर प्रदेशात झालेला विकास, महिला सुरक्षेत झालेली वाढ योगींच्या विजयासाठी महत्वाची ठरल्याचे आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

आ. चंद्रशेखर बावनकुळे हे योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर मतदारसंघाचे प्रभारी होते. यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, गोरखपूरमध्ये योगदान देण्याचे मला भाग्य लाभले. ही संधी म्हणजे एकप्रकारची गोरक्षनाथ पिठाची सेवा होती. तेथे कसलाही भेदभाव नव्हता. केवळ योगी आदित्यनाथांप्रती समर्पित जनतेचे दर्शन मला घडले. योगी आदित्यनाथ यांच्यावरचा तिथल्या जनतेचा विश्वास स्पष्ट दिसून येतो. आजचा विजय हा उत्तर प्रदेशाच्या जनतेच्या विश्वासाचा विजय आहे. यासह मणिपूर, उत्तराखंड, गोव्याच्या विजयाबद्दल आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आनंद व्यक्त केला.