ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांना मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार जाहीर

मुंबई – गेल्या सहा दशकांहून अधिक काळ संगीत क्षेत्रात प्रदीर्घ काळ सेवा करताना आपल्या बासरीच्या सुरांचे वेड लावणारे ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांना यावर्षीचा मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्‍कार तर सुप्रसिध्‍द गायिका दिलराज कौर
यांना सन २०२२ चा मोहम्‍मद रफी पुरस्‍कार देण्‍यात येणार असल्‍याची घोषणा भाजपा नेते आमदार ॲड. आशिष शेलार यांनी आज केली.

आमदार ॲड.आशिष शेलार यांच्या स्पंदन आर्ट या संस्थेतर्फे मोहम्मद रफी यांच्या वाढदिवसादिवशी त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी एका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंताला जीवन गौरव व  मोहम्मद रफी पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. पुरस्काराचे हे पंधरावे वर्ष असून एक लाख रू. धनादेश, स्मृतीचिन्ह आणि शाल श्रीफळ असे जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप असून, ५१ हजार रू. धनादेश आणि मानचिन्ह असे रफी पुरस्काराचे स्वरूप आहे. मोहम्मद रफी यांचे कुटुंबिय आमदार ॲड. आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघात वास्तव्यास असून त्यांच्या उपस्थितीत दरवर्षी हा पुरस्काराचा शानदार सोहळा रंगशारदा येथे पार पडतो. गेल्या १४ वर्षात मोहम्मद रफी यांच्या सोबत काम केलेल्या अनेक मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आल्याने उत्तरोत्तर या पुरस्काराची प्रतिष्ठा वाढत गेली.

यावर्षी ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांना मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्‍कार तर सुप्रसिध्‍द गायिका दिलराज कौर
यांना सन २०२२ चा मोहम्‍मद रफी पुरस्कार जाहीर करताना आपल्याला आनंद होतो आहे, या दोघांचेही संगीत जगतात मोठे योगदान असून त्‍यांचा सन्‍मान करण्‍याची संधी आम्‍हाला मिळाली याबद्दल आमदार ॲड. आशिष शेलार यांनी आनंद व्‍यक्‍त केला आहे. वांद्रे पश्चिम रंगशारदा येथे २४ डिसेंबर रोजी दरवर्षी प्रमाणे हा पुरस्कार वितरण सोहळा संध्याकाळी ६.०० वा. सुरू होणार संगीत क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत यावर्षी या पुरस्‍काराचे वितरण करण्‍यात येणार आहे.

यावेळी प्रसाद महाडकर यांच्या जीवनगाणीतर्फे फिर रफी या बहारदार मैफिलीत ख्यातनाम गायक श्रीकांत नारायण हे मोहम्मह रफी यांची अजरामर गाणी सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे निवेदन संदीप कोकीळ करणार आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य असून त्याच्या प्रवेशिका आमदार ॲड. आशिष शेलार यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत.

यापुर्वी  संगीतकार आनंदजी, गायक अमीत कुमार यांच्यासह ज्येष्ठ गायिका आशा भोसले, सुरेश वाडकर, शमशाद बेगम, संगितकार रवी, शैलेंद्र सिंग, नौशाद अली, पॅरेलाल, सुमन कल्याणपूर,  अनुराधा पौडवाल,  खय्याम, पंडित हृदयनाथ मंगेशकर, कविता कृष्णमूर्ती तसेच मरणोत्‍तर श्रीकांत ठाकरे, अशा विविध मान्यवर कलावंतासह ख्यातनाम निवेदक अमीन सयानी यांनांही यापुरस्काराने गौरविण्यात आले आहे.