रशियावर हल्ला करण्याचा पाश्चात्य देशांचा बेत असल्याचा पुतीन यांचा दावा निराधार – बायडन

युक्रेन(Ukraine) हा कधीच रशियासाठी विजय ठरू शकत नाही,असं मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन(Joe Biden) यांनी काल व्यक्त केलं.पोलंडची राजधानी वॉर्सॉ(Warsaw) इथल्या राजप्रासादाच्या बाहेर जमलेल्या हजारो नागरिकांना संबोधित करताना ते बोलत होते.कीव्ह आजही भक्कमपणे,अभिमानाने, मान उंच करून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतंत्र उभं आहे,असं ते म्हणाले.

पाश्चात्य देशांकडून युक्रेनला मदत मिळत राहील,त्यात कुठेही खंड पडणार नाही.या मुद्द्यावर नाटोमध्ये कोणतेही मतभेद होणार नाहीत,असं आश्वासन त्यांनी दिलं.जो बायडन सध्या पोलंडच्या दौऱ्यावर आहेत.गेल्या वर्षभरातला हा त्यांचा दुसरा दौरा आहे. आदल्या दिवशी त्यांनी युक्रेनची राजधानी कीव्हला आकस्मात भेट दिली. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पाश्चात्य देशांवर केलेल्या आरोपांनाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं.

रशियावर हल्ला करण्याचा पाश्चात्य देशांचा बेत असल्याचा पुतीन यांचा दावा निराधार आहे,असं ते म्हणाले.रशियाच्या लाखो नागरिकांना त्यांच्या शेजाऱ्यांसोबत शांतपणे राहायचं आहे.हे आपले शत्रू नाहीत,असंही बायडन यांनी सांगितलं.आज बायडन नाटोच्या पूर्व आघाडीवरच्या 9 देशांच्या प्रमुखांची भेट घेतील.