हिंदूहृदय सम्राट, धर्मवीर या पदव्या कधीही मागून मिळत नाहीत; उद्धव ठाकरेंचा टोमणा

ठाणे – हिंदूहृदय सम्राट, धर्मवीर( Dharmaveer)  या पदव्या कधीही मागून मिळत नाहीत, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Chief Minister Uddhav Thackeray)  यांनी टोलेबाजी केली आहे. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. आनंद दिघे हे नुसते शिवसैनिक नव्हते तर निष्ठा काय असते ते त्यांच्याकडून शिकण्यासारखं होतं.असंही ते म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, त्यांचं निधन झालं तेव्हा ते ५० वर्षांचे होते. मात्र त्यांनी जे दिवसरात्र काम केलं आणि कार्यकर्ते घडवले ते पाहता त्यांनी १०० वर्षांचं काम केलं असंच म्हणावं लागेल. शिवसैनिकांचे डोळे आजही त्यांच्या आठवणीने ओलावतात. हिंदू हृदय सम्राट, धर्मवीर या ज्या पदव्या असतात त्या कुणालाही मागून मिळत नाहीत. त्या जनता ठरवत असते.असं ठाकरे म्हणाले.

दरम्यान ‘धर्मवीर’ या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघेंची भूमिका साकारली आहे. ठाण्यामध्ये शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून आनंद दिघेंची ओळख होती. या चित्रपटाच्या माध्यमातून आनंद दिघे यांच्या व्यक्तीमत्वामधील एक सामान्य व्यक्ती, शिवसेना कार्यकर्ता ते ठाण्यातील शिवसेनेचा सर्वात प्रमुख नेता असा प्रवास उलगडणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केलं आहे. तर मंगेश देसाई यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. येत्या १३ मे रोजी ‘धर्मवीर मु. पो. ठाणे’ हा चित्रपट झी स्टुडिओजच्या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.