Nana Patole | नरेंद्र मोदी गाझा पट्टीतील युद्ध थांबवू शकतात पण पेपरफुटी मात्र थांबवू शकत नाहीत

Nana Patole | भारतीय जनता पक्षाने लोकसभेची निवडणूक षडयंत्र करून जिंकली आहे. बॅलेट पेपरवरच निवडणुका झाल्या पाहिजेत ही जनतेची मागणी आहे, जनतेचा ईव्हीएम वर विश्वास नाही त्यासाठी देशभरात आंदोलने झाली. अमेरिका, जपानसारखे जगातील अनेक प्रगत देश बॅलेट पेपरवर निवडणुका लढवतात पण भारतातच ईव्हीएम कशासाठी वापरली जात आहे. लोकसभा निवडणुकीत धनशक्तीचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला, प्रशासनाला हाताशी धरून षडयंत्र करुन भाजपाने जागा जिंकल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा कोकणात झालेल्या पराभवाचा पदवीधर निवडणूकीत बदला घ्या, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केले आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघातील मविआचे उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचारार्थ ठाणे येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. ते पुढे म्हणाले की, विधान परिषदेची निवडणूक एकजुटीने लढून जिंकू आणि विरोधकांची हवा काढून घेऊ. या निवडणुकीत महायुतीचा फुगा सुशिक्षितांनी फोडला तर आगामी निवडणुकीत त्याचा परिणाम दिसेल म्हणून ही निवडणूक वेगळी आहे. मुंबईतील दोन जागा, नाशिक व कोकण या चारही मतदार संघात महाविकास आघाडी एकदिलाने निवडणूक लढत आहे. या निवडणुकीत धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीच्या उमेदवाराला निवडून द्यावे, असे आवाहन नाना पटोले यांनी केले आहे.

राज्यात बेरोजगारीची संख्या मोठी आहे पण सरकार मात्र नोकर भरती करत नाही. महाराष्ट्र हे बेरोजगारांचे राज्य झाले आहे. गाझा मध्ये सुरु असलेले युद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थांबवले असा दावा करतात पण देशातील पेपरफुटी मात्र मोदी थांबवू शकत नाहीत. नीट परिक्षेतील पेपरफुटीमुळे लाखो मुलांचे भवितव्य अंधारात नेण्याचे पाप भाजपा सरकारने केले आहे असे नाना पटोले म्हणाले.

यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान म्हणाले की, पदविधरांची समस्या माहित असलेल्या, कोकणातील पदविधरांच्या समस्या माहिती असलेल्या व्यक्तीलाच या पदावर निवडून दिले पाहिजे म्हणूनच महाविकास आघाडीने पदविधरांच्या समस्या माहिती असलेल्या रमेश कीर यांना उमेदवारी दिली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातील २.२५ लाख मतदारांपैकी जवळपास १.७५ लाख मतदारांची नोंदणी मविआने केली आहे. सर्वांनी एकदिलाने काम करावे व मुंबई, नाशिक कोकण मतदारसंघातील चारही उमेदवारांना बहुमताने विजयी करा असे आवाहन केले.

या मेळाव्याला प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व माजी मंत्री नसीम खान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, माजी खासदार राजन विचारे, प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा, ठाणे काँग्रेस शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण, ठाणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दयानंद चोरगे, राजन विचारे, ज्योती ठाकरे, वैशाली दरेकर, गजानन देसाई यांच्यासह महाविकास आघाडीतील मित्रपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप