पाच दिवसात ३.२० पैशांनी पेट्रोल-डिझेलची दरवाढ; मोदीजी कुठे आहेत अच्छे दिन – राष्ट्रवादी 

मुंबई  – पाच दिवसात ३.२० पैशांनी पेट्रोल-डिझेलची दरवाढ आणि गॅसची ५० रुपयांनी दरवाढ झाल्याने मोदीजी तुम्ही सांगितलेले कुठे आहेत अच्छे दिन असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला आहे.

२०१४ च्या निवडणुकीमध्ये सबंध देशाला ‘अच्छे दिन’ चे आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारने खऱ्या अर्थाने देशाच्या नागरिकांवर पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढीच्या निमित्ताने फार मोठे आर्थिक संकट आणले आहे असेही महेश तपासे म्हणाले.

मोदीसाहेबांच्या राज्यांमध्ये केंद्रसरकार कुठलाच आर्थिक बोजा सहन करायला तयार नाही म्हणून कुठलीही दरवाढ झाली तर ती थेट नागरीकांच्या माथ्यावर मारायची असेच धोरण भाजप सरकारचे आहे असा आरोपही महेश तपासे यांनी केला आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये देशातल्या अर्थसंकल्पावर चर्चा होणे अपेक्षित आहे परंतु काश्मिर फाईल सारख्या विषयाची जेव्हा अर्थमंत्री चर्चा करतात तेव्हा या सरकारचं लक्ष नेमकं कुठे आहे हे आपल्याला दिसून येते असेही महेश तपासे म्हणाले.

महागाईने आठ महिन्यांचा उच्चांक गाठलेला असताना देखील मोदी सरकार कुठल्याच प्रकारे नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रयत्नशील नाही ही वस्तुस्थिती आज जनतेपासून लपलेली नाही अशी टीकाही महेश तपासे यांनी केली.