संजय राऊत यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा नवनीत राणा यांचा आरोप

मुंबई : राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसेना ( Shiv Sena ) यांच्यात दिवसभर राडा पाहायला मिळाला. या संपूर्ण वादावरुन राजकारण ढवळून निघालं. या वादानंतर अखेर राणा दाम्पत्याला (Navneet Rana and ravi rana) खार पोलिसांनी (Khar Police) अटक केली असून त्यांच्यावर 153 अ हे कलम लावण्यात आलं आहे.

कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करणे, धर्म, वंश आणि भाषेच्या आधारे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणे आणि समाजाची शांतता भंग करणे (Disrupting the peace of the society) असे आरोप या कलमांतर्गत करण्यात आले आहेत. उद्या राणा दाम्पत्याला न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. काही वेळापूर्वीच राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आलं आहे.

दरम्यान, खासदार नवनीत राणा यांनी संजय राऊत (sanjay Raut) यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत तसेच अनिल परब यांच्याविरोधात राणा दाम्पत्याने तक्रार दाखल केली आहे. तसेच अज्ञात अशा 500 ते 600 शिवसैनिकांविरोधातही त्यांनी तक्रार दाखल केली आहे. मारहाण करुन हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यासाठी शिवसैनिकांनी अॅम्ब्युलन्स आणली असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.