कोविडच्या काळात महाराष्ट्र आणि देशाला अन्न मिळवून देणाऱ्या शेतकऱ्यांचे सुप्रिया सुळे यांनी मानले आभार

मुंबई – महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६२ वा वर्धापन दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त आज खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांना वंदन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकर आणि कै. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांच्या प्रेरणेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. याच विचारांचा आदर्श ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आता महाविकास आघाडी सरकार काम करत आहे असे प्रतिपादन खासदार सुळे यांनी केले.

गेली दोन वर्ष कोविडच्या काळात महाराष्ट्र आणि देशाला अन्न मिळवून देणाऱ्या शेतकऱ्यांचे सुळे यांनी आभार मानले. संपूर्ण जग लॉकडाऊन असताना शेतकरी मात्र अन्न पिकवत होता. त्यामुळेच देशाचे प्रधानमंत्री म्हणतात की, आपण चारशे बिलियन डॉलर्सची निर्यात करतो आहोत. या निर्यातीमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा खूप मोठा वाटा आहे. आपला शेतकरी फक्त देशालाच नाही तर जगाला अन्न देतो. देशाच्या समृद्धीमध्ये आपल्या राज्याचे योगदान कसे राहिल, याचा विचार करून आपण काम केले पाहीजे, असेही  सुळे म्हणाल्या.

पक्ष कार्यालयातील महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाला दरवर्षी नवाब मलिक उपस्थित असायचे. आज त्यांची कमतरता नक्कीच जाणवत आहे. आपले काही नेते अडचणीत आहेत, मात्र त्यांच्यावरील अन्याय कधीतरी नक्कीच दूर होईल, अशी अपेक्षाही  सुळे यांनी व्यक्त केली.

यावेळी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष नरेंद्र राणे व राखी जाधव, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, सेवा दलाचे कार्याध्यक्ष जान्हबा मस्के, मुंबई विभागीय युवक कार्याध्यक्ष निलेश भोसले, डॉक्टर सेलचे राज्यप्रमुख डॉ. नरेंद्र काळे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, मुंबई सेवा दल अध्यक्ष दीपक पवार, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष विजय वाडकर, मुंबई विद्यार्थी अध्यक्ष प्रशांत दिवटे आणि मुंबईच्या सर्व जिल्ह्यांचे अध्यक्ष, मुंबईतील मान्यवर नेते उपस्थित होते.