सरस्वतीचे फोटो काढले जाणार नाहीत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कणखर भूमिका 

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे वादग्रस्त विधानामुळे नेहमी चर्चेत येत असतात. आता देखील ते त्यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. यावेळी भुजबळ यांनी माता सरस्वतीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे.

‘शाळेत शारदा, सरस्वती मातेचा फोटो का? ज्या मातेला आम्ही कधी पाहिलं नाही. कधी आम्हाला शिकवलं नाही. शिकवलं असेल तर केवळ तीन टक्क्यांना शिकवलं. आम्हाला दूर ठेवलं. त्यांची पूजा कशासाठी करायची? देशातील महापुरूष तुमचे देव असले पाहिजे. देशात महापुरूषांच्या विचारांची पूजा झाली पाहिजे, असे भुजबळ म्हणाले आहेत.

देवी सरस्वतीला कुणी पाहिले आहे का? पाहिले असेल तरी फक्त 3% लोकांना सरस्वती देवीने शिकवलं असेल असं म्हणत भुजबळ यांनी जातीयवादी फुत्कार सोडले. शाळेत सरस्वतीचा फोटो का पाहिजे? शाळांमध्ये फुले, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटलांचे फोटो लावा अशी मागणीही भुजबळांनी केली. या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा जातीयवादी चेहरा समोर आला असून या वक्तव्यावर अनेकांनी टीका केली आहे.

दरम्यान, या वादावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरस्वतीचे फोटो काढले जाणार नाही, कोणाला काय वाटेल ते करणार नाही. जे लोकांना वाटते, तेच आम्ही करणार अशी खरमरीत प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली आहे.