राष्ट्रवादीचा पुष्पा : राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेवकावर चंदनचोरीचा गुन्हा !

बीड : दक्षिण भारताच्या चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार अल्लू अर्जुन याच्या पुष्पा चित्रपटाने संपूर्ण देशाला वेड लावले आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन साकारत असलेले पुष्पा हे पात्र चंदन चोर दाखवलेले आहे. असाच एका पुष्पाची महाराष्ट्रात जोरदार चर्चा सुरु आहे आणि विशेष म्हणजे हा दुसरा तिसरा कोणी नसून राष्ट्रवादी काँग्रेसचा नवनिर्वाचित नगरसेवक आहे.

सध्या सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या कारवायांमुळे एकेक राजकीय पदाधिकाऱ्यांच्या दोन नंबर धंद्यांच्या कुंडल्या बाहेर निघत आहेत. आता केज नगर पंचायतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकावर चंदनचोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. बालासाहेब दत्तात्रय जाधव असे गुन्हा नोंद झालेल्या नगरसेवकाचे नाव आहे.

यापूर्वीही जाधववर चंदनचोरीचा गुन्हा नोंद आहे. यापूर्वी केजचे सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी गुटख्यांच्या गोदामावर छापा टाकल्यानंतर तत्कालिन शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पक्षाने त्यांच्या जिल्हाप्रमुख पदाला स्थगिती दिली.

तर बीडजवळील जुगार अड्ड्यावरील छापा प्रकरणात भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यावरही गुन्हा दाखल आहे. या दोन्ही प्रकरणांच्या चर्चेचे गुऱ्हाळ थांबते न थांबते तोच आता केज नगर पंचायतीच्या नवनिर्वाचित नगरसेवकावरही चंदनचोरीचा गुन्हा नोंद झाला आहे.