मायकल लोबो मतदारांना पैशांचे आमिष दाखवत असल्याचा भाजपचा आरोप

साळगाव – गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाचे सत्र चालूच आहे. यातच मायकल लोबो यांच्यावर भाजप उमेदवार जयेश साळगावकर यांनी अतिशय गंभीर आरोप केले आहेत. लोबो यांच्यावर निवडणुकीच्या काळात पैसे वाटप करत असल्याचा आरोप जयेश साळगावकर यांनी केला आहे.

बार्देश तालुक्यात पैशांची पाकिटे वाटून मतदारांची किंमत केली जात आहे. लोबो यांच्या एका फ्लॅटमध्ये पैशांची पाकिटे भरण्याचे काम चालते. म्हापसा, साळगाव व शिवोली मतदारसंघांत ही पाकिटे पोहोचवली जात आहेत, असा गंभीर आरोप साळगावकर यांनी केला.

निवडणूक   उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर साळगावकर बोलत होते. पैशांची आमिषे दाखवून लोबो यांच्यासारखे नेते लोकांना लाचार करत आहेत. निवडणूक आयोगाने यात लक्ष घालून याचा तपास लावावा, अशी मागणी साळगावकर यांनी केली.

लोकांना स्वावलंबी करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. साळगाव मतदारसंघांतील लोक स्वाभिमानी आहेत. ते पैशांना बळी पडणार नाहीत. लक्ष्मीच्या माध्यमातून दारात आलेली पैशांची पाकिटे जनतेने घ्यावी आणि १४ फेब्रुवारीला योग्य उमेदवारास मतदान करावे, असे आवाहन साळगावकर यांनी केले. दरम्यान, हे आरोप तथ्यहीन असून १० मार्च रोजी जयेश साळगावकर यांना त्यांची जागा कळेल, असे प्रत्युत्तर काँग्रेस नेते मायकल लोबो यांनी दिले आहे.