आता काँग्रेस गप्प बसणारा नाही, नाना पटोलेंचा राष्ट्रवादीला थेट इशारा !

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मालेगावचे माजी आमदार शेख रशीद शेख शफी आणि मालेगाव महानगरपालिकेच्या महापौर ताहेरा शेख रशीद यांच्यासह २८ नगरसेवकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, माजी खासदार समीर भुजबळ, नाशिक ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र नाना पगार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महेबुब शेख, कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, मालेगाव तालुकाध्यक्ष संदीप पवार उपस्थित होते.

जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या सर्व नगरसेवकांचे स्वागत केले. तसेच पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. मालेगावमधील या पक्षप्रवेशामुळे आता पुढील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा आमदार निश्चित झाला आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. कोरोनाचा प्रभाव ओसरल्यानंतर आदरणीय शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत मालेगावमध्ये मोठी सभा घेणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले. ज्याप्रमाणे राष्ट्रवादीने पिंपरी-चिंचवड आणि इतर महानगरपालिकांमध्ये विकास साधला आहे, त्याप्रमाणेच राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली मालेगावचा चेहरा-मोहरा बदलण्याचे काम करु, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक फोडल्याची घटना काँग्रेसच्या कमालीची जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणात फोडाफोडी होतेच त्याला जशास तसे उत्तर द्यायचे असते असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही नेते, कार्यकर्ते काँग्रेसमध्ये येणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. राष्ट्रवादीतून येणाऱ्यांची नावे उघड केली तर ते अलर्ट होतील, असे सूचक व्यक्तव्य पटोले यांनी केले. त्यामुळे ते राष्ट्रवादीचे नेते फोडणार असल्याचे स्पष्ट केले.

राज्यात स्वबळावर निवडणुकांच्या तयारी चालविलेल्या आणि त्यासाठी मुंबईत गुरूवारी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरू असतानाच मालेगावमधील काँग्रेसच्या माजी आमदार, महापौरांसह नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याचे पडसाद महाविकास आघाडीवर विशेषत: दोन्ही काँग्रेसच्या राजकारणावर उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर पटोले यांनी भूमिका मांडली.

‘ज्यांनी स्वत: पक्ष सोडला त्यांनी नाराजी मांडण्याचे कारण नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधूनही काहीजण काँग्रेसमध्ये येणार आहेत. ज्यांनी आमचे नगरसेवक फोडले, त्यांचेही भविष्यात काय करायचे ते ठरवू महाविकास आघाडी असली, तरीही, राजकारण सुरूच असते. अशा राजकारणाला त्याच भाषेत उत्तर द्यायचे असते. तशी तयारी काँग्रेसची आहे. काँग्रेस पक्ष गप्प बसणारा नाही.’ असा थेट इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.