शिवनेरीवर संभाजीराजेंनी शासकीय कार्यक्रमास उपस्थित राहणे जाणीवपूर्वक टाळले?

पुणे – आज युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी शिवजयंती निमित्त शिवजन्मस्थळ किल्ले शिवनेरीवर उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले. मात्र महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थित न राहता ते तडक गड उतार झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार, आदित्य ठाकरे, बाळासाहेब थोरात व दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत होणाऱ्या शासकीय सभेलाही उपस्थित राहणे संभाजीराजे यांनी जाणीवपूर्वक टाळले.

मराठा समाजाने केलेल्या मागण्या सरकारने मान्य करूनही आज ८ महिने उलटले तरी त्यांची अमलबजावणी केलेली नाही, म्हणून युवराज संभाजीराजे २६ फेब्रुवारी पासून आझाद मैदान, मुंबई येथे आमरण उपोषणास बसणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर युवराज संभाजीराजेंनी आज शासकीय कार्यक्रमातून काढता पाय घेऊन सरकारला नेमके काय सूचित केले, यावर राजकीय वर्तुळात तर्क वितर्क सुरू झाले आहेत.