रामदेव बाबांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करा, तृप्ती देसाईंची मागणी

पुणे : ठाण्यातील पतंजलीच्या महिला महासंमेलनात योगगुरू रामदेव बाबांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. महिला साडी-सलवारमध्ये छान दिसतात, काही घातलं नाही तरी छान दिसतात, असं रामदेव बाबा म्हणाले. रामदेव बाबांच्या या संतापजनक वक्तव्यानंतर त्यांवर आता चौफेर टीका होत आहे. अशात भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी रामदेव बाबांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

योगगुरु रामदेव बाबा यांचा आपण सगळेच आदर करतो. परंतु आज त्यांनी महिलांच्या बाबतीत जे वक्तव्य केले आहे ते अत्यंत लज्जास्पद आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की, महिला साडी नेसली तरी छान दिसतात, ड्रेस घातला तरी छान दिसतात आणि त्यांच्या नजरेने जर पाहिलं तर महिलांनी काहीही घातलं नाही तरी त्या छान दिसतात. म्हणजे कुठल्या नजरेने रामदेव बाबा? असा सवाल तृप्ती देसाई यांनी केला आहे.

महिलांना लज्जा उत्पन्न होईल असं वक्तव्य रामदेव बाबाने केलेले आहे. त्यामुळे सुमोटो ॲक्शन घेऊन महिला आयोगाने आणि सरकारने आणि पोलिसांनी त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे.

दुसरीकडे, मुख्य म्हणजे यावेळी अमृता फडणवीस यांच्यासमोरच रामदेव बाबांनी हे वक्तव्य केलं. तर या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंही उपस्थित होते. याचाच धागा पकडत तृप्ती देसाई यांनी त्यावेळी स्टेजवर असणाऱ्यांना देखील फटकारले आहे. त्या म्हणाल्या, महिलांवर होणारे बलात्कार, विनयभंग यासारख्या ज्या घटना आहेत त्यानंतर मेणबत्त्या जाळणारे अशी वक्तव्य करताना जेव्हा मोठ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात हे अत्यंत लाजिरवाणे आहे.

महिलांना लज्जा उत्पन्न होईल असेच वक्तव्य तुम्ही केले आणि त्यामागे नेमकं तुमचं काय कारण होतं? तुम्हाला काय म्हणायचं होतं? याचं स्पष्टीकरण जर नीट मिळालं नाही तर तुमच्या एखाद्या कार्यक्रमात येऊन मी आता जाब विचारणार आहे. असा थेट इशारा देखील तृप्ती देसाई यांनी रामदेव बाबांना दिला आहे.