भाजपाने नेहमीच राजकारणात ओबीसींना मोठे करण्याच्या दृष्टीने निर्णय घेतले – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर –  भारतीय जनता पार्टीनेच या देशात ओबीसींना सर्वाधिक न्याय दिला. ओबीसींना न्याय देऊन विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कामही याच पक्षाने केले. त्यामुळे भाजप ओबीसी विरोधी असल्याचा आरोप  करणाऱ्यांना या राज्यातील ओबीसी जनताच धडा शिकविणार आहे, असा विश्वास आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका पत्रपरिषदेतून केला.

देशाच्या मंत्रिमंडळात 27 पेक्षा अधिक मंत्री ओबीसी आहेत. ओबीसींना आर्थिक, शैक्षणिक व अन्य सवलती मिळाव्या म्हणून केंद्र सरकारने निर्णय घेतले आहे. एवढेच नव्हे तर वैद्यकीय शिक्षण  घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती मिळाव्या म्हणून केंद्र शासन सर्वोच्च न्यायालयात गेले. त्यानंतरच ओबीसी विद्यार्थी आणि नॉन क्रिमीलेअरच्या विद्यार्थ्यांना सवलती मिळाल्या, असे सांगताना आ. बावनकुळे म्हणाले- राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय तयार करण्यात आले. एवढे स्पष्ट असताना ओबीसींना आरक्षण नाकारले जाण्यास भाजपाला बदनाम करून भाजप ओबीसी विरोधी आहेत, असा आरोप काही नेते करतात. त्यांना जनता निश्चितपणे धडा शिकवेल. आरोप करणाऱ्यांना कुण्या पक्षात जायचे ते जावे. पण भाजपाला ओबीसीविरोधी म्हणणे योग्य नाही, असेही आ. बावनकुळे म्हणाले.

भाजपाने नेहमीच राजकारणात ओबीसींना मोठे करण्याच्या दृष्टीने निर्णय घेतले व न्याय दिला आहे. आजही पक्षात ओबीसींचे अनेक मोठे नेते नेतृत्व करीत आहेत व त्यांच्या नेतृत्वात पक्षाची यशस्वी आगेकूच होत आहे. पक्षाचा हा यशस्वी प्रवास आणि विकास न पाहवूनच काही नेते बेताल आरोप करीत आहेत, असेही आ. बावनकुळे म्हणाले.

 राऊतांची विधाने कपोलकल्पित

खा. संजय राऊत यांच्या विधानावर एका प्रश्नावर बोलताना आ. बावनकुळे म्हणाले- संजय राऊतांना दिवसभर टीव्ही राहण्यासाठी ते विपरित विधाने करीत असतात. त्यांची विधाने कपोलकल्पित आहेत. त्यांच्या शब्दावर किती विश्वास ठेवायचा हे आता जनतेला कळले आहे. महाविकास आघाडी सरकार सतत मागासवर्गीय व दलित समाजावर अन्याय करीत आहे. सरकारच्या अन्यायाची अनेक प्रकरणे समोर येत आहे. पण सरकार मागासवर्गीयांची दखलच घेत नाही. हे सरकार खऱ्या अर्थाने संवेदनशील असेल तर त्यांनी मागासवर्गीयांच्या समस्यांना प्राधान्य देऊन त्या सोडवाव्या असेही आ. बावनकुळे म्हणाले.