‘शिवरायांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध’; मोदींनी खास फोटो ट्वीट करत केले अभिवादन

पुणे – छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सवाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी शिवरायांना वंदन केलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलं आहे.

पंतप्रधानांनी शिवरायांना वंदन करतानाचा एक फोटो शेअर करत म्हटलं आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना नमन करतो. त्यांचे अतुलनीय नेतृत्व आणि समाजकल्याणासाठी त्यांनी केलेलं कार्य पिढ्यानपिढ्या लोकांना प्रेरणा देत आहे. सत्य आणि न्यायाच्या मूल्यांसाठी उभे राहण्याच्या बाबतीत ते ठाम होते. त्यांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे.कोल्हापुरच्या शिवाजी विद्यापीठातर्फे इतिहास संशोधक डॉक्टर सुरेश शिखरे यांचं विशेष ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज यांची आरमार निती’ असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. सकाळी 11 वाजता शिवाजी विद्यापीठाच्या ‘शिव-वार्ता’ या युट्यूब वाहिनीवरुन या व्याख्यानाचं प्रसारण होणार आहे.

शिवजयंती निमित्त नंदूरबार जिल्ह्यात शहाद्यातील एका तरुणीनं रांगोळीच्या माध्यमातून पाच हजार चौरस फूट जागेत शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारली आहे. बी फार्मसीची विद्यार्थीनी असलेल्या वैष्णवी पाटील हिनं शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात 96 तासांच्या मेहनतीतून ही प्रतिमा साकारली आहे.

अमरावतीमध्ये शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांनी पन्नास फूट लांबीची पर्यावरण-पूरक तलवार बनवली आणि त्या तलवारीवर शिवसृष्टी निर्माण केली आहे. ही तलवार घडविण्यासाठी अठरा दिवस लागले.