शिंदे-ठाकरे गटात वाद : प्रभादेवीतील राडा प्रकरणी 25 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल

Mumbai – प्रभादेवीत मध्यरात्री झालेल्या शिवसेना-शिंदे गटातील राडा प्रकरणी दादर पोलिसांनी 25 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत यांचाही समावेश आहे. मारहाण झालेले शिंदे गटातील संतोष तेलवणे यांच्या फिर्यादीवरून दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश सावंत, शैलेश माळी, संजय भगत आणि इतर दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

महेश सावंत यांनी शिविगाळ केली आणि अंगावर धावून आले. सावंत आणि त्यांच्या साथीदारांनी मारहाण केली. या दरम्यान पोलीस आल्यानंतर झालेल्या धावपळीत गळ्यातील 30 ग्रॅम सोन्याची चैन पंचमुखी रुद्राक्षासह पळवून नेली असल्याची तक्रार तेलवणे यांनी केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत, यशवंत विचले यांच्यासह 25 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

शिवसेना विभाग प्रमुख महेश सावंत, शैलेश माळी, संजय भगत, विनायक देवरुखकर, प्रथमेश बीडू, विपुल ताटकर, यशवंत विचले, विजय पांडे, चंदन साळुंखे, संजय सावंत, दुतेश रहाटे, रवी पड्याचील यांच्यासह इतर काही अज्ञातांविरोधात भारतीय दंड कलम 143, 147, 148, 149, 395, 324, 323, 504, 506 आदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी दादर पोलीस स्थानकात हवेत गोळीबार केला, असा आरोपही शिवसैनिकांकडून करण्यात आला आहे. मात्र, सरवणकर यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. घरगुती वादातून भांडण झालं, असं सदा सरवणकर यांनी म्हटलंय. तर सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याच्या आरोपावर तेलवणे म्हणाले की, गोळीबार हा वाघावर होतो, शेळ्यांवर नाही. पोलीसस्थानकात कोणताही गोळीबार झाला नाही. अटक करण्यासाठी आणि प्रकरण वाढवण्यासाठी ही खोटी बातमी पसरवली जात असल्याचे तेलवणे म्हणाले.