Narendra Modi | ओबीसी आरक्षण मुस्लिमांना देण्याचा काँग्रेसचा कर्नाटकी कट हाणून पाडा, पंतप्रधान मोदींचे आवाहन

Narendra Modi | कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारने मुस्लिमांना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट केले आणि ओबीसी समाजाचे संपूर्ण आरक्षण काढून घेऊन रातोरात मुस्लिमांना वाटून टाकले, आता हाच फॉर्म्युला देशभर राबविण्याचा काँग्रेसचा कट आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शनिवारी कोल्हापूर येथे जाहीर सभेत बोलताना केला. कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या महाविजय संकल्प सभेत ते बोलत होते.

कोल्हापूरकर असा गोल करतील, की ज्यामुळे पुढचे सारे टप्पे इंडी आघाडीवाले पूर्ण चीत होतील, असा विश्वास व्यक्त करून, जगात भारी कोल्हापुरी अशी घोषणाही मोदी यांनी दिली. विकसित भारताच्या संकल्पाची ही निवडणूक आहे, पण विकासाच्या मुद्द्यावर आपण एनडीएची बरोबरी करू शकत नाही याची जाणीव जेव्हा काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना झाली, तेव्हा त्यांनी आपली रणनीती बदलली, आणि देशविरोधी अजेंडा व तुष्टीकरणाचा वापर सुरू केला. आता सत्तेवर आल्यावर कलम 370 पुन्हा आणण्याचा काँग्रेसचा अजेंडा आहे, पण काँग्रेसचा हा मनसुबा जनता हाणून पाडेल, सीएए कायदा रद्द करण्याचा प्रयत्न केलाच, तर त्यांची हालत काय होईल हे त्यांना माहीत नाही. ज्यांना तीन अंकी आकडा गाठता येणार नाही, ते सत्तेच्या दरवाजापर्यंत तरी पोहोचतील का, असा सवालही त्यांनी केला.

आता ‘एक साल एक पीएम’ हा फॉर्म्युला बनवायला ते निघालेत, पाच वर्षांत पाच पंतप्रधान, असा खेळ खेळायची आखणी ते करत आहेत, पण हा फॉर्मुला बनवणाऱ्यांना देश कधीच सहन करणार नाही याची जाणीव झाल्यामुळे, आता ते देशावर राग काढत आहेत. दक्षिण भारताला तोडून अलग देश करण्याची मागणी ते करत आहेत. ‘अहत पेशावर, तहत तंजावर हिंदवी स्वराज्य’ ही घोषणा ज्या भूमीत झाली, ती छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी, काँग्रेसच्या अशा अजेंड्याला मान्यता देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. तसे करायला गेले, तर त्यांना जनता चोख उत्तर देईल, असेही ते म्हणाले.

अयोध्येतील राम मंदिराचे पाचशे वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले, पण दशकानुदशके राम मंदिरास विरोध करणाऱ्या काँग्रेसने त्यावरही बहिष्कार टाकला. प्रभू रामाच्या दरबाराचे निमंत्रण धुडकावणाऱ्यांना कधी माफ केले जाऊ शकत नाही, असेही ते म्हणाले. जो राम को ठुकरायेगा, उसको जनता ठुकरायेगी, असा इशारा त्यांनी दिला. जे नेते सनातनला डेंग्यू म्हणाले, सनातनच्या विनाशाची भाषा करू लागले, त्या डीएमकेच्या नेत्यांना महाराष्ट्रात बोलावून त्यांचा सत्कार करणाऱ्यांना पाहून बाळासाहेब ठाकरेंना किती दुःख वाटले असेल, असा सवाल करून त्यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. नकली शिवसेनेचे हे नेते आता अशा लोकांच्या खांद्याला खांदा लावून चालत आहेत, यामुळे बाळासाहेबांच्या आत्म्याला वेदना होत असतील, असे ते म्हणाले.

लांगूलचालन व वोट बँकेचे राजकारण करणाऱ्या काँग्रेस आघाडीची नजर आता लोकांची कमाई व दलित, मागासवर्गीयांच्या संपत्तीवर पडली आहे. या देशाच्या साधनसंपत्तीवर ज्यांचा पहिला हक्क आहे असे काँग्रेस मानते, त्यांना तुमची कमाई काढून घेऊन वाटण्याचा काँग्रेसचा कट आहे, असा इशारा त्यांनी दिला.

संपत्तीचा संपूर्ण हिस्सा वारसांना मिळू नये यासाठी वारसा कर लादण्याचे काँग्रेसचे स्वप्न जनता सफल होऊ देणार नाही. महाराष्ट्राची ही भूमी सामाजिक न्यायाचे प्रतीक आहे. पण काँग्रेस व इंडी आघाडीने सामाजिक न्याय पायदळी तुडविला. दलित, आदिवासी, एससी, एसटी, ओबीसी कोट्यातील आरक्षण काढून घेऊन मुसलमानांना देण्यासाठी काँग्रेसने कर्नाटकात रातोरात सर्व मुस्लिमांना ओबीसी ठरविले, आणि ओबीसींचे सारे आरक्षण मुसलमानांना मिळाले. हा कर्नाटक फॉर्म्युला संपूर्ण देशात राबविण्याचा कट काँग्रेसने आखला आहे. याआधीही संविधान बदलून आरक्षणावर डल्ला मारण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला होता, पण तो यशस्वी होऊ दिला गेला नाही. ज्यांनी कर्नाटकात वंचितांच्या आरक्षणावर डल्ला मारला, त्यांना देशात थारा मिळता कामा नये, असा इशाराही मोदी यांनी दिला. एनडीएने आत्मनिर्भर भारताच्या माध्यमातून, स्टार्टअप इंडियामधून देशातील जनतेसमोर संधींची द्वारे खुली केली, ज्या युवकांना काँग्रेसने रोजगार आणि नोकऱ्यांसाठी वणवण करायला लावली, तो युवक आता यशस्वी व आत्मनिर्भर होऊन जगाच्या पाठीवर अभिमानाने मिरवत आहे, असा दावाही त्यांनी केला. येत्या पाच वर्षांत विकासाच्या प्रत्येक टप्प्यातील यशाचा वाटा जनतेला मिळेल ही मोदी (Narendra Modi) की गॅरंटी आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Devendra Fadnavis | महायुतीला मोदींचे इंजिन असून हे इंजिन देशातील नव्हे तर जगातील पॉवरफुल इंजिन

Ajit Pawar | बारामतीत काही लोकांनी मी केलेल्या कामांची पुस्तिका छापली, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

Dharashiv LokSabha | नरेंद्र मोदी यांच्या सभेची धाराशिवरांना उत्सुकता, ‘या’ दिवशी करणार दौरा