लखीमपूर खिरी मधील मयत दलित मुलींच्या कुटुंबियांची रामदास आठवले यांनी घेतली सांत्वनपर भेट

लाखीमपूर खीरी – उत्तर प्रदेशातील लाखीमपूर खीरी (Lakhimpur Khiri)मधील दोन अल्पवयीन दलित बहिणींची सामूहिक बलात्कार करून निर्घृण हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला होता.त्या  निषेधार्ह प्रकरणातील मयत दलित बहिणींच्या कुटुंबियांची लखीमपूर खिरी जिल्ह्यातील तामोली पूर्वाच्या लालपूर मजरा गावातील राहत्या घरी जाऊन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मयत मुलींच्या शोकाकुल कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी पीडीत मयत मुलींचे भाऊ वडील आणि आई उपस्थित होते. या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने त्यांचे सांत्वन करीत धीर देण्याचे आणि या प्रकरणातील गुन्हेगारांना फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून फासावर लटकविण्यासाठी प्रयत्न सरकार करीत असल्याचे आश्वासन रामदास आठवले यांनी दिले.

मयत दलित मुलींच्या कुटुंबाला सामाजिक न्याय मंत्रालय तर्फे एट्रोसिटी ऍक्ट नुसार 16 लाख 50 हजार देण्यात येत असल्याची घोषणा  रामदास आठवले यांनी केली. मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी (Chief Minister Adityanath Yogi) यांच्या वतीने राज्य सरकार तर्फे पीडित मयत मुलीच्या कुटुंबाला 1 एकर जमिनीचा पट्टा आणि 25 लाख रुपये सांत्वनपर निधी देण्यात येणार असल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली.

लखीमपूर खिरी तील लालपूर मजरा तामोळी पूर्वा गावातील दलित समाजाच्या दोन अल्पवयीन सख्या बहिणींना नराधम तरुणांनी घरातून बोलावून नेले. त्या मुलींच्या आईने ते पहिले होते. दिवसा दुपारी 3 वाजता त्या मुलींना नेऊन सामूहिक अत्याचार करून गळा दाबून त्या मुलींची हत्या करण्यात आली. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या अत्याचार आणि खून प्रकरणात पोलिसांनी 6 आरोपीना अटक केली आहे. मात्र गावातील लोकांची साक्ष घेतली पाहिजे. दिवसाढवळ्या हा  प्रकार घडला असल्याने गावातील लोकांनी कुणातरी या नराधम तरुणांना जाता येता पाहिले असेल. त्या अनुषंगाने पोलिसांनी अधिक तपास करून सखोल चौकशी करून साक्षीदारांची साक्ष नोंदवावी. लवकरात लवकर पोलिसांनी चार्जशीट न्यायालयात दाखल करावे. या प्रकरणी खटला जलद गती न्यायालयात चालवून तीन महिन्यात निकाल लावून नराधम गुन्हेगारांना फाशीची कठोर शिक्षा करावी अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे उत्तर प्रदेश अध्यक्ष पवन गुप्ता सोबत होते.