Uniform Civil Code : समान नागरी कायदाला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा, पण…

Uniform Civil Code News: समान नागरी संहिता (यूसीसी) बाबत देशात गोंधळ सुरू आहे. या मुद्द्यावर पीएम मोदींच्या वतीने वक्तव्य दिल्यानंतर चर्चेला उधाण आले आहे. या मुद्द्यावर काही विरोधी पक्ष केंद्र सरकारला पाठिंबा देताना दिसत आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या पदाधिकाऱ्यांची आज मातोश्रीवर बैठक पार पडली. यामध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. यावेळी समान नागरी कायद्याला पाठिंबा असल्याचे यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले. समान नागरी कायद्यासंदर्भात (Uniform Civil Code) ठाकरेंच्या या बैठकीत चर्चा झाली. या कायद्याला आमचा पाठिंबा असून जोपर्यंत मसुदा या कायद्यासंदर्भात समोर येत नाही तोपर्यंत यावर भाष्य करणे किंवा भूमिका योग्य नसल्याचं ठाकरे गटाकडून सांगण्यात आले आहे.

समान नागरी कायदा हा मुद्दा आगामी निवडणुका विचारात घेता आणला आहे, आणि भाजप हा मुद्दा समोर आणून निवडणुकांना सामोरे जाणार आहे. त्यामुळे जोपर्यंत मसुदा येत नाही तोपर्यंत या संदर्भात कुठली भाष्य करणं अथवा मग भूमिका मांडणे योग्य नाही असं ठाकरे गटाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी उत्तराखंडमध्ये लवकरच समान नागरी संहिता लागू करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. तर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी UCC ला विरोध केला आणि आरोप केला की हा मुद्दा मांडण्यामागे भाजपचा निवडणूक अजेंडा आहे आणि केंद्र सरकारला त्याची अंमलबजावणी करण्यापासून मागे हटण्याची विनंती केली.