‘रोहितजी…प्रसिद्धीच्या झोतात राहण्याच्या आपल्या सवयीला लगाम घाला किंवा किमान थोडा अभ्यास करा’

पुणे –  राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना ३ मार्च पर्यंत ED कोठडी सुनावली आहे. टेरर फंडिंग केल्याचा आरोप असणाऱ्या मलिक यांच्यावर कारवाई झाल्यानंतर आता महाविकास आघाडीच्या नेते आणि कार्यकर्ते  हे या अटकेच्या कारवाईचा निषेध व्यक्त करत आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या घडामोडींवर भाष्य करताना भविष्यातील वाटचाल कशी असावी याबाबत आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले,आरोप करून रान उठवायचं, बदनामी करून नेरेटिव्ह सेट करायचं, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून संविधानाने दिलेला आवाज उठवण्याचा हक्क चिरडायचा, असे प्रयत्न कपटी शत्रू करत असेल तर त्याविरोधात गांधीजींच्या सत्याच्या मार्गासोबतच भगतसिंग, राजगुरूंच्या आक्रमकतेच्या मार्गानेही लढावं लागेल.

दरम्यान, याच मुद्द्यावरून भाजपचे पुणे शहर प्रवक्ता संदीप खर्डेकर यांनी पवार यांच्यावर शरसंधान केले आहे. ‘आझाद मराठी’ला दिलेल्या प्रतिक्रियेत ते म्हणतात, चला ह्या निमित्ताने आदरणीय शरद पवार साहेबांच्या नातवाला महात्मा गांधी यांच्यासह स्वातंत्र्य लढ्यात इतरही क्रांतिकारक होते याची आठवण झाली तर!! भगतसिंग यांच्यासह रोहितजींनी आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, उधमसिंग, लाल बाल पाल, चंद्रशेखर आझाद, चापेकर बंधू, सुखदेव, शिवराम हरी राजगुरू, बटूकेश्वर दत्त, रामप्रसाद बिस्मिल यांच्यासह इतर क्रांतिकारकांच्या चरित्राचा ही अभ्यास करावा. या व्यतिरिक्त अवघ्या जगाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी कपटी शत्रूचा कोथळा कसा बाहेर काढला, शाहिस्तेखानाची बोटं कशी छाटली या इतिहासाची ही उजळणी करावी.

या सर्वांनीच परकीयांविरुद्ध म्हणजेच इंग्रज, मुघल यांच्या विरोधात सशस्त्र लढा दिला. रोहितजी भगतसिंगांचा मार्ग म्हणजे ? त्यांनी जे पी सॅंडर्स ला गोळया घातल्या तसे आपण करू इच्छिता की सेंट्रल असेंबलीत बॉम्बफेक ? ️असे हिंसेला प्रोत्साहन देणारे tweet आपल्याकडून अपेक्षित नाही.यापुढे प्रसिद्धीच्या झोतात राहण्याच्या आपल्या सवयीला लगाम घाला किंवा किमान थोडा अभ्यास करा. स्वकीयांविरुद्ध लढायला न्यायालयाचा मार्ग आहे रोहितजी. लोकशाही प्रक्रियेला बाधा पोहोचेल असे वक्तव्य आपल्याकडून अपेक्षित नाही. असं खर्डेकर यांनी म्हटलं आहे.