लोकसभेनंतर राज्यसभेतून १९ विरोधी खासदारांचे निलंबन, वेलमध्ये जोरदार घोषणाबाजी

नवी दिल्ली-  राज्यसभेच्या १९ सदस्यांना आठवडाभरासाठी निलंबित करण्यात आले आहे. त्यात मौसम नूर, एल. यादव, व्ही. शिवदासन, अबीर रंजन बिस्वास, सुष्मिता देव, शांता छेत्री, मोहम्मद अब्दुल्ला, ए.ए. रहीम, कनिमोझी, डॉ. शांतनु सेन, नदीम-उल-हक आणि डोला सेन. सभागृहाच्या वेलमध्ये घुसून घोषणाबाजी केल्याप्रकरणी राज्यसभा खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.

अन्य निलंबित खासदारांमध्ये आर वड्डीराजू, एस कल्याणसुंदरम, आर गिरंजन, एन आर एलांगो, एम षणमुगम, दामोदर राव दिवाकोंडा आणि पी संदोष कुमार यांचा समावेश आहे. यापूर्वी राज्यसभेत विरोधकांनी गदारोळ केला होता. राज्यसभेत उपसभापती भुवनेश्वर कलिता यांच्यावरही कागद फेकण्यात आला आहे. काही निलंबित खासदारांनी हा पेपर फेकला आहे.

दरम्यान, नुकतेच  महागाईविरोधात घोषणाबाजी केल्याने काँग्रेसच्या चार खासदारांना लोकसभेच्या उर्वरित अधिवेशनातून निलंबित करण्यात आले. काँग्रेस खासदारांनी हातात फलक घेऊन सभागृहात घोषणाबाजी केली. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी खासदारांना इशारा दिला होता की, सभागृहात फलक घेऊन आलेल्या कोणत्याही खासदाराला कामकाजात भाग घेऊ दिला जाणार नाही. यानंतर काँग्रेस खासदार मणिकम टागोर, ज्योतिमनी, रम्या हरिदास आणि टीएन प्रतापन यांना निलंबित करण्यात आले. खासदारांच्या निलंबनावर काँग्रेसमधून तीव्र प्रतिक्रिया उमटली. खासदारांना निलंबित करून सरकार आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न करत आहे, असे पक्षाने म्हटले होते.