ओबीसी आरक्षण : आमच्या प्रयत्नांना यश आले याचे समाधान – जयंत पाटील

मुंबई – ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) स्वागत केले असून ओबीसी (OBC) समाजाचे राजकीय प्रतिनिधित्व कायम राहावे यासाठी आम्ही प्रयत्न केले व त्या प्रयत्नांना यश आल्याचे मला समाधान आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil)यांनी दिली आहे. राज्यात ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (२० जुलै) झालेल्या सुनावणीत बांठिया आयोगानुसार निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.

राज्यात ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्यास मान्यता देण्याच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे जयंत पाटील यांनी मनापासून स्वागत केले आहे. महाविकास आघाडी सरकारने सदर आरक्षण टिकवण्यासाठी मोठी मेहनत घेतली होती. आरक्षणासाठी लागणारा अहवाल सादर करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने बांठिया आयोग नेमला होता. या अहवालानुसार निवडणुका घ्याव्यात असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिल्याचे समाधानही जयंत पाटील यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र निवडणूक आयोगाने कोणताही विचार न करता ताबडतोब निवडणुका जाहीर कराव्यात अशी मागणीही जयंत पाटील यांनी यावेळी केली.