Nana Patole : व्हायरल Video बद्दल नाना पटोले यांनी स्पष्टच सांगितलं, चित्रा वाघ यांच्याबद्दलही बोलले

मुंबई – महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी एक व्हिडीओ ट्विट करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या व्हिडीओमध्ये महिलेसोबत दिसत असलेली व्यक्ती ही नाना पटोले हे असल्याचा दावा करत चित्रा वाघ यांनी तो नाना पटोले यांना टॅग केला आहे. तसेच काय नाना, तुम्ही पण झाडी, डोंगार आणि हाटिलात? असा खोचक प्रश्न विचारला आहे.

 

 

व्हायरल व्हिडीओमध्ये काय आहे?

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये नाना पटोले चेरापुंजी, मेघालय येथे हॉटेलमध्ये एका महिलेसोबत खुर्चीवर बसल्याचे दिसत आहे. या व्हिडीओमध्ये नाना पटोले यांचे फोटोही जोडण्यात आले आहेत. सोबत काय झाडी काय डोंगर हे गाणेही जोडण्यात आले आहे. व्हिडीओमध्ये नाना पटोले असल्याचे म्हणत तो सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओप्रकरणी (Viral video) बोलताना नाना पटोले यांनी आपली बाजू मांडली. मला बदनाम करण्याचं कारस्थान असून याबाबत व्हिडिओची तपासणी करुन आमच्याकडून कायदेशीर बाजू मांडण्यात येईल. ”मी सध्या पूराच्या दौऱ्यामध्ये आहे, पण राजकारणाची पातळी जी खाली उतरलीय त्याचा हा परिणाम आहे. लोकांसाठी काम करणाऱ्या लोकांना बदनाम करण्याची ही प्रक्रिया सुरू आहे. यासंदर्भात आमची लीगल टीम कार्यवाही करणार आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं. चित्रा वाघ यांच्याबद्दल बोलताना मला त्या ताईंबद्दल काहीही बोलायचं नाही, संजय राठोडांबाबत (Sanjay Rathore) त्यांनी काय केलं. आमच्या प्रकरणात काय घडलंय ते आमची लीगल टीम पाहातेय, उद्या ते सत्य बाहेर येईल, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.

दरम्यान, पब्लिक डोमेनमध्ये जोपर्यंत एखादी गोष्ट येत नाही तोपर्यंत ती खासगी असते. एकदा ती सार्वजनिक झाल्यानंतर लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारण्याची आपल्याला मुभा आहे. त्यामुळे सगळेच प्रश्न विचारतात. मीच प्रश्न विचारला अशातला भाग नाही. त्यामुळे नाना पटोलेंनी उत्तर द्यावे, असे चित्रा वाघ यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत म्हटले आहे.