Sawai Gandharva Mahotsav pune 2022: तयारी पूर्ण! आजपासून रंगणार सवाई गंधर्व महोत्सव

Sawai Gandharva Mahotsav pune 2022 : – संगीतप्रेमी पुणेकरांसाठी पर्वणी असलेल्या सवाई गंधर्व महोत्सवाला आजपासून सुरु होणार आहे. या महोत्सवासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. 68 वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित आला आहे. त्यामुळे पुढील चार दिवस पुणेकरांना संगीताची मेजवानी अनुभवायचा मिळणार आहे. मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडासंकुलात हा महोत्सव पार पडणार आहे.

यंदाच्या महोत्सवाविषयी बोलताना श्रीनिवास जोशी म्हणाले, “कोविड काळात भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांची जन्मशताब्दी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात साजरी करता आली नाही, मात्र यंदाच्या महोत्सवात ती साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त देशाच्या विविध भागात वास्तव्यास असलेल्या किराणा घराण्याच्या गायकांचा विशेष सहभाग हे महोत्सवाचे वैशिष्ट्य असेल. तसेच महोत्सवाशी दीर्घकाळ संबंधित असलेले मात्र नजीकच्या काळात स्वर्गवासी झालेल्या कलाकारांचे कुटुंबीय व शिष्यांना महोत्सवात सहभागी करून घेत, मंडळ त्यांना आगळीवेगळी श्रद्धांजली वाहणार आहे.”

गेली दोन वर्षे कोरोनामुळे महोत्सवाचे आयोजन करता आले नसल्याने संगीत रसिकांचा हिरमोड झाला होता, त्यामुळे यंदाच्या महोत्सवाची आखणी करताना रसिकांना संगीताच्या विविध पैलूंचा आनंद घेता येईल, याचा विशेष विचार करण्यात आला आहे. तसेच महोत्सवात देशातील व देशाबाहेरील प्रतिथयश व नवोदित कलाकारांना विशेष स्थान देऊन महोत्सवाची रंगत वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचेही श्रीनिवास जोशी यांनी नमूद केले.

महोत्सवाची वेळ पहिले तीन दिवस म्हणजेच दि. १४, १५ व १६ डिसेंबर रोजी दुपारी ४ ते रात्री १० अशी असेल. महोत्सव शनिवार १७ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता सुरू होईल आणि परवानगी मिळाल्यास रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहील. शेवटच्या दिवशी महोत्सवाची वेळ दुपारी १२ ते रात्री १० अशी असेल.

६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात सहभागी होणा-या कलाकारांची यादी खालीलप्रमाणे-

दिवस पहिला – (१४ डिसेंबर, २०२२)
पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधत महोत्सवाची सुरुवात भीमसेनजींचे ज्येष्ठ शिष्य व किराणा घराण्याचे गायक पं. उपेंद्र भट यांच्या गायनाने होईल. त्यानंतर ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका शाश्वती मंडल यांचे गायन होईल. संगीतमार्तंड पं. जसराज यांची अनुपस्थिती यंदा महोत्सवात नक्कीच जाणवेल, हीच बाब लक्षात घेत त्यांचे भाचे व शिष्य पं. रतनमोहन शर्मा यांचे गायन सादर होईल. महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा शेवट सुप्रसिद्ध सरोदवादक पद्म विभूषण अमजद अली खाँ यांच्या बहारदार सरोदवादनाने होईल.

दिवस दुसरा – (१५ डिसेंबर, २०२२)
महोत्सवाच्या दुस-या दिवसाची सुरुवात देखील किराणा घराण्याचे दिल्लीस्थित गायक अविनाश कुमार यांच्या गायनाने होईल. यानंतर महान सरोदवादक उस्ताद अली अकबर खाँ यांचे सुपुत्र आलम खाँ यांचे सरोदवादन होईल. आलम खाँ हे मेहर सेनी घराण्याचे सुप्रसिद्ध सरोदवादक असून अमेरिकेत वास्तव्यास आहेत. दिवंगत पं. राजन मिश्रा यांचे बंधू पं. साजन मिश्रा व त्यांचे पुत्र स्वरांश मिश्रा हे यानंतर सहगायन करतील. दुस-या दिवसाचा शेवट सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक एन. राजम, त्यांच्या कन्या संगीता शंकर आणि  नाती रागिणी व नंदिनी शंकर यांच्या व्हायोलिन वादनाने होईल.

दिवस तिसरा – (१६ डिसेंबर, २०२२)
महोत्सवाच्या तिस-या दिवसाची सुरुवात कोलकातास्थित किराणा घराण्याच्या गायिका मनाली बोस यांच्या गायनाने होईल. यांनतर पं. शिवकुमार शर्मा यांचे सुपुत्र व प्रसिद्ध संतूरवादक राहुल शर्मा यांचे संतूरवादन होईल. भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे सुपुत्र श्रीनिवास जोशी यानंतर आपली गायनकला सादर करतील. तिस-या दिवसाचा समारोप पद्मभूषण पं. अजॉय चक्रबर्ती याच्या गायनाने होईल.

दिवस चौथा- (१७ डिसेंबर, २०२२)
जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिका पद्मा तळवलकर यांच्या शिष्या असलेल्या यशस्वी सरपोतदार यांच्या गायनाने महोत्सवाच्या चौथ्या दिवसाची सुरुवात होईल. यानंतर धृपद गायक उमाकांत गुंदेचा आणि अनंत गुंदेचा यांचे सहगायन होईल. आग्रा घराण्याच्या बंगळूरूस्थित भारती प्रताप यानंतर आपली गायन कला सादर करतील. यानंतर भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे नातू व श्रीनिवास जोशी यांचे सुपुत्र व शिष्य विराज जोशी हे आपली गायनसेवा रुजू करतील. सुप्रसिद्ध गायक, संगीतकार सिड श्रीराम यांचे कर्नाटक शास्त्रीय गायन आणि त्यानंतर चौथ्या दिवसाच्या शेवटी होणा-या उस्ताद रशीद खाँ आणि उस्ताद शाहीद परवेज यांची जुगलबंदी चौथ्या दिवशीचे वैशिष्ट्य असेल. आपल्या ख्याल गायकीसाठी प्रसिद्ध असलेले उस्ताद रशीद खाँ हे रामपूर- सहसवान घराण्याचे ज्येष्ठ कलाकार असून उस्ताद शाहीद परवेज हे इमदादखानी घराण्याचे जगप्रसिद्ध सतारवादक आहेत.

दिवस पाचवा- (१८ डिसेंबर, २०२२)
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा शेवटच्या दिवसाची सुरुवात भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य आनंद भाटे यांच्या गायनाने होईल. यानंतर बनारस घराण्याचे ज्येष्ठ बासरीवादक राजेंद्र प्रसन्ना यांचे बासरीवादन होईल. पं. भीमसेन जोशी यांचे दीर्घकाळ मार्गदर्शन लाभलेले राजेंद्र कंदलगावकर यांचे गायन यानंतर सादर होईल. राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रसिद्ध गायक महेश काळे व अमेरिकेतील संदीप नारायण यांच्या हिंदुस्थानी- कर्नाटक संगीत जुगलबंदीचा आनंद देखील रसिकांना या दिवशी घेता येईल. गेली बरीच वर्षे अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या प्रसिद्ध कथक नृत्यांगना व अभिनेत्री अर्चना जोगळेकर यांचा नृत्याविष्कार बघण्याची संधी यानंतर उपस्थित रसिकांना मिळेल. किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनाने ६८ व्या सवाई गंधर्व महोत्सवाची सांगता होईल.

महोत्सवात पहिल्यांदाच आपली कला सादर करणारे कलाकार खालीलप्रमाणे
अविनाश कुमार, आलम खाँ, मनाली बोस, यशस्वी सरपोतदार, सिड श्रीराम, राजेंद्र प्रसन्न आणि संदीप नारायण

यंदाच्या महोत्सवास कल्याणी ग्रुप, फिनोलेक्स, नांदेड सिटी, पी एन गाडगीळ अँड सन्स, डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, पृथ्वी एडीफिस, बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी, महामेट्रो, गोखले कंस्ट्रक्शन्स, लोकमान्य मल्टीपर्पज- को ऑपरेटिव्ह सोसायटी, सुहाना (Kalyani Group, Finolex, Nanded City, P N Gadgil & Sons, D. Y. Patil University, Prithvi Edifice, Buldhana Urban Co-operative Credit Society, Mahametro, Gokhale Constructions, Lokmanya Multipurpose- Co-operative Society, Suhana) आणि आशा पब्लिसिटी यांचे सहकार्य लाभले आहे. महोत्सवाच्या मार्केटिंग आणि ब्रँडिंग कम्युनिकेशनची जबाबदारी इंडियन मॅजिक आय या संस्थेकडे असेल.