अश्विनी जगतापच असणार चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार? ‘या’ कृतीमुळे सुरु झाली चर्चा 

Pune : पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या या निधनाने विधानसभेच्या या जागा रिक्त झाल्या आहेत. या जागांवर पोटनिवडणुक होत असून बंडखोरी ही या निवडणुकीत राजकीय पक्षांसाठी डोकेदुखी ठरू शकते अशी चर्चा आहे.

यातच आता स्व. लक्ष्मण जगताप (lakshman jagtap) यांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini jagtap) यांनी भाजपसाठी नामनिर्देश पत्र विकत घेतलेलं आहे. चिंचवडचे (chinchwad bypoll election) आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर उमेदवारी कोणाला मिळेल? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यांच्या कुटुंबियांना उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि त्यांचे लहान बंधू शंकर जगताप (Shankar Jagtap) या दोघांची नावं चर्चेत होती. मात्र अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज विकत घेतल्याने भाजपकडून आता त्याच उमेदवार असणार का? याबाबत राज्यभर चर्चांना उधाण आलेलं आहे.

दरम्यान, दुसऱ्या बाजूला चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे. राष्ट्रवादीकडून चिंचवड शहरातील काही नावांची जोरदार चर्चा सुरू होती. त्यात  नाना काटे यांचंदेखील नाव होतं. मात्र राष्ट्रवादीची पोटनिवडणुकीबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट करण्याआधीच नाना काटे अर्ज विकत घेतला आहे. नाना काटे यांनी अर्ज विकत घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.