कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाही; शरद पवार यांची डरकाळी

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचा शरद पवार (Sharad Pawar) गट हा देखील भाजप सोबत जाणार अशी चर्चा सुरु असताना आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपबरोबर जाणार नाही. भाजपच्या (BJP) कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. लढेन, पण विचारधारेशी कदापि तडजोड करणार नाही,अशी स्पष्ट भूमिका पवार यांनी मंगळवारी मांडली.

राष्ट्रवादीच्या पुणे शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिल्लीत पवार यांची भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधताना पवार यांनी पक्षाची आगामी वाटचाल स्पष्ट केली. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव आणि चिन्ह याबाबत कायदेशीर लढाई सुरू आहे. शिवसेनेसंदर्भात निवडणूक आयोगावर दबाव आणून ज्या पद्धतीने पक्ष आणि चिन्ह काढून घेण्यात आले तसा प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पुढे बोलताना ते म्हणाले, आम्ही या दबावाला घाबरणार नाही. नाव आणि चिन्ह नसले, तरी पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणले जाईल. विचारधारेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. त्यामुळे भाजपला साथ देण्याचा प्रश्नच येत नाही. लढून नव्याने पुन्हा सर्व काही उभे केले जाईल, अशा शब्दांत पवार यांनी कार्यकर्त्यांना आश्वस्त केले.