शपथविधी पूर्वी राष्ट्रवादीच्या आमदारांची दिशाभूल करुन सह्या घेतल्या?

Mumbai – राज्यातील राजकारणात आज पुन्हा एकदा मोठ्या हालचाली झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक मोठा गट भाजप शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाला आहे.

राजभवनात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची (Ajit Pawar Deputy Chief Minister) तर इतर काही नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, या सर्व आमदारांनी पक्षाच्या ध्येय धोरणाविरुद्ध भूमिका घेतली असल्यानं त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितलं.

आज अजित पवार यांच्यासमवेत गेलेल्या काही आमदारांचा नंतर माझ्याशी संपर्क झाला असून त्यांनी आम्हाला घडलेल्या प्रकाराबद्दल काहीही कल्पना न देता आमच्या सह्या घेतल्याची भूमिका मांडली आहे; त्यामुळं येत्या दोन तीन दिवसांत चित्र आणखी स्पष्ट होईल असं पवार म्हणाले.