अजितदादांसह ४० आमदारांनी सरकारमध्ये येण्याचा निर्णय घेतला? बावनकुळे यांनी सांगितली इनसाईड स्टोरी

Mumbai – राज्यातील राजकारणात आज पुन्हा एकदा मोठ्या हालचाली झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक मोठा गट भाजप शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाला आहे.

राजभवनात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर इतर काही नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, या सर्व आमदारांनी पक्षाच्या ध्येय धोरणाविरुद्ध भूमिका घेतली असल्यानं त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितलं.

आज अजित पवार यांच्यासमवेत गेलेल्या काही आमदारांचा नंतर माझ्याशी संपर्क झाला असून त्यांनी आम्हाला घडलेल्या प्रकाराबद्दल काहीही कल्पना न देता आमच्या सह्या घेतल्याची भूमिका मांडली आहे; त्यामुळं येत्या दोन तीन दिवसांत चित्र आणखी स्पष्ट होईल असं पवार म्हणाले.

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आज घडलेल्या घडामोडींवर भाष्य केले आहे. ते म्हणाले, पंतप्रधाननरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीपथावर मार्गक्रमण करत आहे. त्यांनी भारताला जगात सर्वोत्कृष्ठ देश निर्माण करण्याचा संकल्प केला आहे. हेच विकासपर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे नेत आहेत. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजितदादा पवार यांनी ४० आमदारांसह सरकारमध्ये येण्याचा निर्णय घेतला, ही आनंदाची बाब आहे. त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळे महाराष्ट्र व देशाला नवी ऊभारी मिळाली आहे. मोदीजींच्या नेतृत्वात प्रचंड ताकदवान भारत निर्माण करण्याकरिता हे मोठं पाउल आहे असं त्यांनी सांगितले आहे.