Eknath Shinde | एनडीए नेते पदी नरेंद्र मोदी यांच्या निवडीला शिवसेनेचा पाठिंबा, मुख्यमंत्री शिंदे यांचे अनुमोदन

Eknath Shinde | लोकसभा निवडणुकीत बहुमत प्राप्त केलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या मुख्य नेते पदी नरेंद्र मोदी यांची निवड करण्यात आली. या प्रस्तावाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुमोदन देत शिवसेना पक्षाचा पाठिंबा जाहीर केला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये शिवसेना हा संख्या बळानुसार चौथा मोठा घटक पक्ष आहे.

संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (एनडीए) महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या गटनेतेपदी निवड करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. प्रस्तावाला अनुमोदन देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आजचा दिवस ऐतिहासिक आणि संस्मरणीय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘एनडीए’च्या नेतेपदी निवड करण्याच्या प्रस्तावाला बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसेनेकडून पूर्ण पाठिंबा देतो, असे मुख्यमंत्र्यांनी (Eknath Shinde) यावेळी जाहीर केले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की मागील १० वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा विकास केला आणि देशाला प्रगतीपथावर आणले. जगभरात भारताचा नावलौकिक वाढवला. देशाच्या अर्थव्यवस्थेला मजबूत केले आणि भारताची नवी ओळख निर्माण करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यामुळे विरोधकांनी खोटा प्रचार आणि अफवा पसरवून देशातील नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला मात्र असे खोटे नॅरेटिव्ह आणि अफवा पसरवणाऱ्यांना देशातील जनतेने नाकारले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीकारले, असे मुख्यमंत्री म्हणाले.

शिवसेना आणि भाजप एक समान विचारधारा असलेले पक्ष आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वातून तयार झालेली शिवसेना भाजप युती म्हणजे फेविकॉलचा जोड आहे, तो कधीही तुटणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप