“कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करा”, राज ठाकरेंचे पत्राद्वारे महाविकास आघाडीला आवाहन

पुणे- कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा पोटनिवडणूकींकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपाने (BJP) या पोटनिवडणुकांसाठी उमेदवार जाहीर केले असून चिंचवडसाठी अश्विनी लक्ष्मण जगताप (Ashwini Lagtap) आणि कसबा पेठसाठी हेमंत रासने (Hemant Rasne) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु असताना विरोधकांनी कोणताही प्रतिसाद दिला नसल्याचे चित्र आहे. अशातच आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून महाविकास आघाडीला पत्र लिहिले आहे. तसेच या पत्राद्वारे त्यांनी सर्व राजकीय पक्षांना एक संदेशही दिला आहे.

जेव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी. अनेकदा त्या पोटनिवडणुकीत उमेदवार हा मृत व्यक्तीच्या घरातील असतो, अशावेळेस पक्षाने जर मृत व्यक्तीच्या घरातील उमेदवार दिला असेल तर, त्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देणं ही एक प्रकारे, राजकीय संस्कृतीने त्या निधन झालेल्या व्यक्तीला श्रद्धांजलीच असते. ही प्रगल्भता महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाही, असे राज ठाकरेंनी आपल्या पत्राद्वारे म्हटले आहे.

तसेच पुढे अंधेरी पोटनिवडणुकीचे उदाहरण देत त्यांनी महाविकास आघाडीला पुण्यातील पोटनिवडणूका बिनविरोध करण्याचे आवाहन दिले आहे. इतकेच नव्हे तर, केवळ पुण्यातील पोटनिवडणुका नव्हेच तर एकूणच अशा दुःखद घटनांमुळे होणाऱ्या पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात ही इच्छाही व्यक्त केली आहे.

राज ठाकरेंनी लिहिले पत्र जशास तसे…

सस्नेह जय महाराष्ट्र,
महाराष्ट्र विधानसभेच्या २ आमदारांच नुकतंच दुःखद निधन झालं. ह्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिडणूका होत आहेत.
मी अगदी सुरुवातीपासून ह्या मताचा आहे की, जेंव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेंव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी.
कारण मुळात जसा त्या विधानसभेतील कौल लोकप्रतिनिधीला असतो, तसाच कौल त्याच्या पक्षाला देखील असतो. अनेकदा त्या पोटनिवडणुकीत उमेदवार हा मृत व्यक्तीच्या घरातील असतो, अशावेळेस पक्षाने जर मृत व्यक्तीच्या घरातील उमेदवार दिला असेल तर, त्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देणं ही एक प्रकारे, राजकीय संस्कृतीने त्या निधन झालेल्या व्यक्तीला श्रद्धांजलीच ठरणार नाही का? आणि ही प्रगल्भता महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाही. अर्थात उमेदवार जर निधन पावलेल्या लोकप्रतिनिधीच्या घरातील नसेल तर, जनता देखील सहानभूती दाखवेलच असं नाही.
अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळेस, दिवंगत आमदार रमेश लटके ह्यांच्या पत्नी शिवसेनेच्या तिकिटावर उभ्या होत्या, त्यावेळेस मी श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांना निवडणूक बिनविरोध करण्याचं आव्हान केलं होतं. ज्याला सकारात्मक प्रतिसाद देत, त्यांनी ती निवडणूक बिनविरोध होऊ दिली.
आता पुन्हा पिंपरी-चिंचवड आणि कसबा विधानसभांमध्ये पोटनिवडणूका होत आहेत. जो उमदेपणा भारतीय जनता पक्षाने दाखवला तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील दाखवावा. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे हे देशाला दाखवून देण्याची संधी आपल्याला सर्वाना आहे. हीच नाही तर एकूणच अशा दुःखद घटनांमुळे होणाऱ्या पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात ही इच्छा.
राज ठाकरे