नागरिकांच्या समस्या आठ दिवसांत सोडवून अहवाल सादर करा; चंद्रकांत पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Pune – नागरिकांशी थेट भेट व जनता दरबाराच्या माध्यमातून त्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी आज ना. चंद्रकांत पाटील यांनी कोथरुडमधील सहवास सोसायटी सभागृहात या भागातील नागरिकांशी संवाद साधला. कोथरूड मधील सहवास सोसायटी भागातील नागरिकांनी मांडलेल्या समस्या तातडीने सोडवून, आठ दिवसांत अहवाल सादर करावा, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज दिल्या.

यावेळी भाजप चे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, माजी नगरसेवक जयंत भावे, दीपक पोटे,ॲड. मिताली सावळेकर, गिरीश खत्री, नवनाथ जाधव, अनुराधा एडके, कुलदीप सावळेकर, महेश पवळे यांच्या सह भाजपाचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जनता दरबारावेळी स्थानिक नागरिकांनी आपल्या काही समस्या नामदार पाटील यांच्या समोर मांडल्या. यात‌ प्रामुख्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होणे, कचरा संकलन आणि विशेषत: झावळ्या आणि झाडांचा पाळा पाचोळा / पानांचा कचरा, डीपी रस्त्यावरील अतिरिक्त वाहतुकीमुळे अंतर्गत सेवा रस्त्यांवर होणारी वाहतूक, टवाळखोर तरुणांमुळे होणारा त्रास, रस्त्यावरील फुगे विक्रेत्यांमुळे महिलांना होणारा त्रास, रात्री अपरात्री वाजविले जाणारे फटाके,डी पी रस्त्यावरील मंगल कार्यालयाबाहेर होणारे अव्यवस्थित पार्किंग व तेथे होणाऱ्या कार्यक्रमांतील कर्णकर्कश्श आवाजामुळे होणारा त्रास ( स्पीकर चा आवाज मान्य डेसिबल पेक्षा जास्त असल्यामुळे ) आदी प्रमुख समस्या मांडल्या.

त्यावर संबंधित अधिकाऱ्यांना सदर समस्या तातडीने सोडवून आठ दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना नामदार पाटील यांनी दिल्या. तसेच,टवाळखोर तरुणांवर चाप बसवण्यासाठी आणि महिला व तरुणींच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवावे, भागातील अतिक्रमणे तातडीने हटवावे आदी सूचना दिल्या.‌तसेच कर्वेनगर मधील विठ्ठल मंदिर रस्ता व अलंकार पोलीस स्टेशन जवळील समर्थ पथ येथील कामं त्वरित पूर्ण करून तेथे डांबरीकरण करावे अश्या सूचना देखील केल्या.

दोन दिवसापूर्वी गिरीजाशंकर सोसायटीत घडलेल्या खड्डा पडण्याच्या घटनेची दखल घेऊन रातोरात दुरुस्तीकार्य करून दिल्याबद्दल सोसायटीचे अध्यक्ष रवी गोखले व भांड यांनी मा. चंद्रकांत यांचा सत्कार केला. तर डॉ. महेश तुळपुळे यांनी सहवास सोसायटीच्या वतीने नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे स्वागत केले, संदीप खर्डेकर यांनी संयोजन व सूत्रसंचालन केले. यावेळी मनपा च्या विविध खात्यांचे अधिकारी व पोलीस अधिकारी उपस्थित होते. सर्व नागरिकांनी चंद्रकांत पाटील यांच्या कार्यतत्परतेबाबत समाधान व्यक्त केले.