‘गांधी गोडसे: एक युद्ध’ सिनेमाच्या दिग्दर्शकाला मिळाली धमकी, मुंबई पोलिसांकडे सुरक्षेसाठी मागणी

दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांचा ‘गांधी गोडसे: एक युद्ध’ हा चित्रपट २६ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. मात्र रिलीजपूर्वीच या चित्रपटावर धोक्याचे ढग दाटून आले आहेत. हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर निर्मात्यांकडून चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू आहे, परंतु त्यांना या प्रमोशनमध्ये अडचणी येत आहेत. कारण हा सिनेमा प्रदर्शित करण्यावरुन दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी धमकी मिळाली आहे. (Rajkumar Santoshi Received Death Threat)

राजकुमार संतोषी यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याच्या धमक्या मिळाल्या असल्याचे सांगितले आहे. राजकुमार संतोषी यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे.

ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला आहे. नुकतेच मुंबईतील अंधेरी येथे या चित्रपटाचे स्क्रिनिंग पार पडले, ज्यामध्ये बराच गदारोळ झाला. स्क्रिनिंगशी संबंधित पत्रकार परिषदेदरम्यान मीडियात बसलेले काही अज्ञात लोक उठले आणि त्यांनी चित्रपटाला विरोध केला. काळे झेंडे दाखवत त्यांनी गांधी जिंदाबादच्या घोषणा दिल्या.

राजकुमार संतोषी यांनी पत्रात लिहिले की, २० जानेवारी रोजी अंधेरी येथे ‘गांधी गोडसे एक युद्ध’ चित्रपटाचे स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. आमची टीम (दिग्दर्शक, निर्माता आणि चित्रपटाचे कलाकार) पत्रकार परिषद करत असताना काही लोकांनी गोंधळ घातला. त्यानंतर काही अज्ञातांकडून चित्रपटाचे प्रदर्शन आणि प्रमोशन थांबवण्याच्या धमक्या आल्या होत्या.

राजकुमार संतोषी यांनी पुढे लिहिले की, धमक्या आल्यानंतर त्यांना सुरक्षित वाटत नाहीय. जर अशा लोकांना सहजासहज सोडले तर त्यांच्यापासून मला आणि माझ्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ शकते.

चित्रपटाला विरोध का होतोय?
खरे तर चित्रपटाला विरोध करणाऱ्यांचे म्हणणे आहे की, चित्रपटात महात्मा गांधींची (Mahatma Gandhi) विटंबना करण्यात आली आहे, तर त्यांचा मारेकरी नथुराम गोडसेचा (Nathuram Godse) गौरव करण्यात आला आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाला आणि प्रमोशनला विरोध होत आहे. याप्रकरणी राजकुमार संतोषी यांना धमक्या मिळाल्या असून त्यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे.