Sunil Tatkare | सर्वसामान्य नागरिकांना मतांचा अधिकार मिळाल्याने भारत देश एकसंघ राहिला

Sunil Tatkare | प्रत्येक देशातील व्यवस्था ही भिन्न आहे. मग तुमचा आणि माझा देश एकसंघ ठेवायचा असेल… त्याची एकात्मता टिकवायची असेल तर या देशातील सर्वसामान्य नागरिकांना मतांचा अधिकार दिला पाहिजे हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फार मोठे उपकार तुमच्या – माझ्या देशावर आहेत म्हणूनच ७५ वर्षाच्या गौरवशाली इतिहासामध्ये हा भारत देश एकसंघ राहिला… एकात्मता टिकली आणि या देशाचे सार्वभौमत्व अबाधित राहिले असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी खेड येथील जाहीर प्रचार सभेत काढले.

गुरुवारी रात्री ८ वाजता खेड शहरात महायुतीची जाहीर प्रचार सभा पार पडली.

१९५२ पासून हा देश संसदेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना या देशातील सुज्ञ जनतेने आपल्या पसंतीची सरकारे निवडली. पूर्वीच्या काळी कॉंग्रेसचे सरकार असायचे. पण इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी जाहीर केली त्यानंतर देशभर प्रक्षोभ उमटला त्यावेळी देशातील जनतेने जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली चळवळ उभी केली. सर्व राजकीय पक्ष जनता पक्षात विलीन झाले आणि कॉंग्रेसचा पराभव झाला व बिगर कॉंग्रेस सरकार देशात आले. इंदिरा गांधी, संजय गांधी यांना पराभवाला सामोरे जावे लागले. १९८० मध्ये पुन्हा एकदा इंदिरा गांधी सत्तेत आल्या. १९८४ साली इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर सहानुभूतीच्या लाटेवर कॉंग्रेसला ४०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या. ते यश कधी पंडित नेहरूंना मिळाले नाही, ते यश कधी इंदिरा गांधींना मिळाले नाही ते यश राजीव गांधी यांना मिळाले. पण त्यानंतर लोकप्रियता इतकी झपाट्याने घसरली की २०० जागासुद्धा नंतर मिळाल्या नाहीत. विश्वनाथ प्रताप सिंगाचे सरकार या देशात आले त्याला भाजपने पाठिंबा दिला. मंडल कमिशनची अंमलबजावणी करण्याचा निर्णय विश्वनाथ प्रतापसिंगानी घेतला देशभरात आगडोंब उसळला त्यांचे सरकार गेले आणि चंद्रशेखर यांचे सरकार आले. चंद्रशेखर यांच्या सरकारला राजीव गांधी यांच्या कॉंग्रेसने पाठिंबा दिला. ज्यांनी इंदिरा गांधी यांच्या विरोधात वातावरण निर्माण केले त्यांना पाठिंबा दिला परंतु राजीव गांधी यांच्या घरावर पाळत ठेवणारे पोलीस आहेत अशी माहिती मिळताच राजीव गांधी यांनी चंद्रशेखर सरकारचा पाठिंबा चार महिन्यात काढला आणि दोन वर्षांत या देशाला पुन्हा निवडणूकीला सामोरे जावे लागले.

नरसिंहराव यांचे सरकार आले त्यांना पाठिंबा दिला कम्युनिस्ट पक्षाने या देशात लेनिन वाद, मार्क्सवाद माओवाद, भांडवलदारांच्या विरोधात रान उठवण्याचे काम कम्युनिस्ट पक्षाने केले. त्यानंतर १९९६,९८,९९ या सलग तीन वर्षामध्ये तीन लोकसभेच्या निवडणुका झाल्या. १९९९ मध्ये वाजपेयींचे सरकार आले २००४ मध्ये मनमोहनसिंगांचे सरकार आले २००९ मध्ये परत मनमोहनसिंगांचे सरकार आले. २०१४ सालामध्ये देश लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे गेला त्यावेळी युपीएचे सरकार येईल असे वातावरण निर्माण झाले परंतु भाजपने मुत्सद्दीपणाने नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली गांधी नेहरू परिवाराखेरीज पहिल्यांदा एका व्यक्तीच्या नावाने देशात मते मागितली गेली आणि संवेदनशील असलेल्या जनतेने मोदींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले आणि भाजपचे सरकार आले अशी इत्यंभूत माहिती सुनिल तटकरे यांनी यावेळी दिली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narendra Modi | “घाबरू नका, पळू नका”, राहुल गांधींना रायबरेलीतून उमेदवारी मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींचा खोचक टोला

Murlidhar Mohol | पुणे रेल्वे स्थानकाचा होणार विस्तार अन्य शहरांशी वाढणार कनेक्टिव्हिटी

Chitra Wagh | मोठ्या ताईंचा एकेक व्हिडिओ पाहून हसू येतं, त्यांचं मानसिक संतुलन ढासळलंय