T20 World Cup 2024 | फ्लोरिडातील पूरसदृश्य परिस्थिती पाहता पाकिस्तानने ठोठावले आयसीसीचे दार, केली ही मागणी

टी20 विश्वचषकाचा ( T20 World Cup 2024) पहिला टप्पा संपत आला आहे. यानंतर 19 जूनपासून सुपर-8 चे सामने सुरू होतील, मात्र त्याआधीच पावसामुळे काही संघांचा खेळ खराब होताना दिसत आहे. श्रीलंकेचा संघ यापूर्वीच याचा बळी ठरला आहे. त्याचबरोबर पावसामुळे इंग्लंडचा संघही सुपर-8मध्ये जाण्यासाठी संघर्ष करत आहे. आता पावसाचा पाकिस्तान संघावर परिणाम होऊ शकतो. पाकिस्तान टी-20 विश्वचषक स्पर्धेत अ गटात आहे आणि त्यांचा उर्वरित सामना फ्लोरिडामध्ये होणार आहे. या सर्व सामन्यांवर पावसाचे सावट आहे. पावसामुळे कोणताही सामना रद्द झाल्यास पाकिस्तानचा संघ ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडेल. हे पाहून पाकिस्तान तणावात असून आता संघाचा माजी कर्णधार अझहर अलीने आयसीसीकडे यावर उपाय काढण्यासाठी विनंती केली आहे.

फ्लोरिडातून सामना हलवण्याची मागणी
पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार असलेल्या अझर अलीने चिंता व्यक्त केली आहे. फ्लोरिडातील पुराचा इशारा पाहता त्यांनी टीव्ही चॅनलद्वारे आयसीसीला (T20 World Cup 2024) सामने तिकडे हलवण्यास सांगितले आहे.

अझहर म्हणाला की, आयसीसीला माहीत आहे की, अनेक सामन्यांवर पावसाचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे काही कारवाई करून तेथील सामने अन्य ठिकाणी हलवावेत. अझहरने आयसीसीच्या निर्णयांवर आणि प्रणालीवर टीका केली. तो म्हणाला की न्यूयॉर्कच्या खेळपट्टीवर आधीच प्रश्नचिन्ह आहे. आता इतके सामने रद्द झाले तर आणखी प्रश्न निर्माण होतील.

पाकिस्तानचा प्रवास फ्लोरिडात संपणार का?
पाकिस्तान संघ अ गटात तीन सामन्यांतून 2 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. या गटातून भारतीय संघ यापूर्वीच सुपर-8 साठी पात्र ठरला आहे. म्हणजेच आता या गटातून आणखी एकच संघ स्पर्धेच्या पुढील टप्प्यात जाऊ शकतो. यासाठी अमेरिका आणि आयर्लंडचे संघ पाकिस्तानसोबत शर्यतीत आहेत. तथापि, आयर्लंडचे अद्याप दोन सामने बाकी आहेत परंतु त्यांच्या निव्वळ धावगतीमुळे बाहेर मानले जात आहे.

अमेरिकेचा संघ 3 सामन्यांत 4 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर पाकिस्तान आता सर्वाधिक 4 गुणांपर्यंत पोहोचू शकतो. जर यूएसएने एक गुण मिळवला तर त्याचे पाच गुण होतील आणि ते सुपर-8 मध्ये जाईल. पाकिस्तान संघ 16 जून रोजी आयर्लंडविरुद्ध आपला पुढचा सामना खेळणार आहे. त्याआधी 14 जूनला आयर्लंडला अमेरिकेविरुद्ध खेळायचे आहे. हे दोन्ही सामने रद्द होण्याचा धोका आहे. एकही सामना रद्द झाला तर पाकिस्तानचा प्रवास संपेल.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप