सुमधुर संगीताच्या साथीने रंगली नववर्षाची संध्याकाळ

'उगम' या सांगीतिक कार्यक्रमाला रसिकांचा भरभरून प्रतिसाद

पुणे  : भारतभरातील कलाकारांनी सादर केलेले बहारदारवादन, हार्मोनियमवादक पं. प्रमोद मराठे यांचा सत्कार, त्यानंतर सादर झालेला ‘ तन्मय इन हार्मनी ‘ हा नवीन संकल्पनेचा अनोखा कार्यक्रम आणि सुमधुर संगीताच्या साथीने रंगलेली नववर्षाची एक अनोखी संध्याकाळ कला रसिकांनी अनुभवली. निमित्त होते ‘उगम ‘ या सांगीतिक कार्यक्रमाचे.

स्वरानुजा संस्थेतर्फे आयोजित हा कार्यक्रम रविवारी टिळक रस्ता येथील न्यू इंग्लिश स्कूल’च्या गणेश सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुुरवातीला हार्मोनियमवादक तन्मय देवचके यांच्या ५० शिष्यांनी आपले वादन सादर केले. उत्तराखंड, गुजरात, कर्नाटक, दिल्ली अशा विविध राज्यातून हे शिष्य पुण्यात आले होते. सर्वप्रथम ८ ते १६ वयोगटातील शिष्यांनी हंसध्वनी रागात तीन तालातील ‘ दाता तू गणपती ‘ ही रचना सादर केली. त्यानंतर तब्बल १५ जणांच्या गटाने राग देस’मध्ये ताल रूपक व दृत तीन तालात हार्मोनियमवरील गती सादर केल्या. राग काफी’मध्ये रूपक व आडाचौतालमधील रचना आणि राग यमनमध्ये झपतालातील प्रसिद्ध तराणा सादर झाला. उस्ताद विलायत खान यांची द्रुत तीन तालातील गत हार्मोनियमवर सादर करत, पहिल्या सत्राचा समारोप करण्यात आला.

त्यानंतर तन्मय यांचे गुरू आणि ज्येष्ठ हार्मोनियमवादक पं. प्रमोद मराठे यांच्या षष्टयब्दीपूर्तीनिमित्त प्रसिद्ध रंगकर्मी सतीश आळेकर यांच्यातर्फे पं.मराठे व त्यांच्या पत्नी परिणीता मराठे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पं. मराठे यांनी आपल्या विद्यार्थ्यांना रियाजाबरोबरच आरोग्याची देखभाल राखण्याचा, नियमित व्यायाम करण्याचा सल्ला देत, त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. आळेकर यांनी ललित कला केंद्रात शिक्षणासाठी बाहेर गावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना पं. मराठे व त्यांच्या पत्नी परिणीता यांनी केलेल्या मदतीबाबत माहिती देत, संगीत क्षेत्रासाठी दिलेल्या योगदानबाबत मराठे दांपत्याचे कौतुक केले.

तन्मय देवचके व त्यांचे सहकारी यांच्या ‘तन्मय इन हार्मनी’ या नवीन संकल्पनेच्या कार्यक्रम सादरीकरणाने या अनोख्या सांगीतिक कार्यक्रमाचा समारोप झाला. हार्मोनियम हे वाद्य केंद्रस्थानी ठेवून, त्याला तबला, सिंथेसायझर, ड्रम,गिटार आणि पियानो (Tabla, synthesizer, drums, guitar and piano) यांसारख्या वाद्यांची जोड देत, रागदारी संगीतासोबतच वेस्टर्न, जॅझ,कर्नाटक संगीत, नाट्यसंगीत, गझल,भावसंगीत (Western, Jazz, Carnatic Music, Drama Music, Ghazal, Emotional Music) असे संगीताचे अनेकविध पैलू रसिकांच्या साथीने उलगडले. त्यांनी ‘ विहार ‘ ही चारुकेशी रागावर आधारित रचना, जॅझ संगीत व भारतीय शास्त्रीय संगीताचा फ्युजन असलेली ‘ सृजन ‘ ही रचना, ‘अनुभूती ‘ हा राग रूपक व मिश्र चापू तालातील ट्रॅक, कवयित्री बहिणाबाई ते संगीतकार ए आर रहमान यांच्यापर्यंतच्या राग पिलू’वर आधारित विविध रचनांचा मेडले, ‘क्वायर ‘ ही स्वरावलींचा समावेश असलेली अनोखी रचना, मोबाईल रिंगटोन मेडले सादर केला. ‘हे सुरांनो चंद्र व्हा ‘ या पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या रचनेचे हार्मोनियम व्हर्जन सादर करत या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

तन्मय यांना आशय कुलकर्णी (तबला),अभिषेक भूरूक (पर्कशन), तन्मय पवार (गिटार), अमृता ठाकूरदेसाई (की-बोर्ड), अथर्व कुलकर्णी आणि निलय सालवी(हार्मोनियम) साथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद देशमुख यांनी केले.