Toyota कारला भारतात लोकप्रिय बनवणारे विक्रम किर्लोस्कर यांचे निधन

नवी दिल्ली : मोटार वाहन उद्योगातील दिग्गज उद्योजक विक्रम किर्लोस्कर (Vikram Kirloskar Death) यांचं निधन झालं आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडचे ​​उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांनी काल अखेरचा श्वास घेतला. ते 64 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी गीतांजली किर्लोस्कर आणि मुलगी मानसी किर्लोस्कर असा परिवार आहे.

टोयोटा कार भारतात लोकप्रिय करण्याचे श्रेय त्यांना जाते. माध्यमांतील वृत्तांनुसार, विक्रम किर्लोस्कर यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता.

टोयोटा इंडियाने पुष्टी केली
टोयोटा इंडियाने मीडिया स्टेटमेंट जारी करून विक्रम किर्लोस्कर यांच्या निधनाची पुष्टी केली आहे. निवेदनात असे लिहिले आहे की, “29 नोव्हेंबर 2022 रोजी टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम एस किर्लोस्कर यांच्या अकाली निधनाबद्दल आम्हाला कळवताना अत्यंत दु:ख होत आहे. या दुःखाच्या प्रसंगी त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच प्रार्थना. आम्ही त्यांच्या कुटुंबिय आणि मित्रांप्रती आमच्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. त्यांच्यावर 30 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 1 वाजता हेब्बल स्मशानभूमी, बेंगळुरू येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.”