Govt scheme: डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेअंतर्गत सौर ऊर्जा कुंपण वाटप योजना काय आहे?

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेअंतर्गत सौर ऊर्जा कुंपण वाटप

योजनेचे स्वरुप: गावातील नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत विकास साधून त्यांची उत्पादकता वाढविण्यासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना राबवण्यात येते. या योजनेचाच एक भाग म्हणून मानव- वन्यप्राणी संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीकोनातून शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कुंपण वाटप करण्यात येते.

लाभाचे स्वरुप: संवेदनशील गावांमध्ये सौर ऊर्जा कुंपणाचा लाभ वैयक्तिकरित्या देण्यात येतो. निश्चित केलेल्या मापदंडाचे सौर ऊर्जा कुंपण साहित्याचा पुरवठा लाभार्थ्यास करण्यात येतो. याकरीता प्रतिलाभार्थी सौर ऊर्जा कुंपणाच्या किमतीच्या ७५ टक्के किंवा रुपये १५ हजार या रकमेपैकी जी कमी असेल त्या रक्कमेचे अनुदान देण्यात येते. सौर ऊर्जा साहित्याच्या किंमतीच्या अनुषंगाने उर्वरीत २५ टक्के किंवा अधिकच्या रक्कमेचा वाटा लाभार्थ्यांचा राहील.

लाभार्थी निवडीचे निकष:
•लाभार्थीकडे गावातील शेतीचा ७/१२, गाव नमुना ८ अथवा वनहक्क कायदा अंतर्गत पट्टा वाटप केल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक.
•गावाचे रहिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक.
•वनगुन्हा नोंदविण्यात आलेल्या व्यक्तीस योजनेचा लाभ देय असणार नाही.तथापि, एखाद्या व्यक्तीवर वाटप झालेल्या वनपट्ट्यासंदर्भात अतिक्रमणाचा गुन्हा नोंदविला गेला असेल त्यास सदर योजनेचा लाभ देय.
• या योजनेंतर्गत वैयक्तिक सौर ऊर्जा कुंपण अथवा सामुहिक लोखंडी जाळीचे कुंपण उभारणी योजना यापैकी एकच योजनेचा लाभ अनुज्ञेय.

संपर्क: उपवनसंरक्षक, वन्यजीव विभाग, वनभवन, तिसरा मजला, भांबुर्डा वन विहार, सर्व्हे क्रमांक  ९७, गोखलेनगर, पुणे- १६/०२०-२५६६८०००, हेल्पलाईन क्रमांक १९२१५ तसेच आपल्या क्षेत्रातील वन परीक्षेत्र अधिकारी कार्यालये