पाच राज्यांमधल्या निवडणुकांचा निकाल; शिवसेना- राष्ट्रवादीच्या कामगिरीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष

नवी दिल्ली- पाच राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया संपल्यानंतर काल जाहीर झालेल्या मतदानोत्तर कल चाचणीत, उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाची सत्ता कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भाजपला 200 पेक्षा जास्त जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कल चाचणीनुसार, पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. गोव्यात जनतेने कोणत्याही पक्षाला स्पष्ट कौल दिला नसल्याचं कल चाचणीत दिसून आलं आहे. मणीपुरमध्ये भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेत येईल, असा अंदाज आहे.

उत्तराखंड विधानसभेत एकूण ७० जागा असून, येथे बहुमतासाठी ३६ जागांची आवश्यकता आहे. मतदानोत्तर चाचण्यांनी येथे भाजपला २६ ते ४६ दरम्यान, तर काँग्रेसला २० ते ३५ जागांचा अंदाज वर्तवला असल्याने येथेही त्रिशंकू स्थिती राहण्याची शक्यता आहे. कुठलाही तिसरा पक्ष येथे स्पर्धेत नाही.उत्तराखंडमध्ये सत्तारूढ भाजप आणि काँग्रेस या पक्षांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळेल असा अंदाज आहे. काही संस्थांच्या सर्वेक्षणानुसार, काँग्रेसला बहुमत मिळेल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादीने देखील या निवडणुकीत आपले नशीब आजमावून पाहिले होते. उत्तर प्रदेश आणि गोव्यातील काही जागा शिवसेना आणि राष्ट्रवादीने लढवल्या होत्या मात्र या दोन्ही पक्षांच्या पदरी केवळ भोपळा मिळणार असल्याचे दिसत आहे. मोठा गाजावाजा करत शिवसेना नेत्यांनी अनेक गंभीर आरोप करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न केला मात्र मतदारांना हा केविलवाणा प्रयत्न लक्षात आल्याने या दोन्ही पक्षांना नाकारले असल्याचे सध्या तरी दिसत आहे.