सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी पाकिस्तानी शिष्टमंडळ भारताला भेट देणार ?

World Cup 2023 :  आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ चे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतरही पाकिस्तानचा संघ भारतात येण्यास अद्याप पूर्णपणे तयार नाही. पाकिस्ताननेही या वेळापत्रकावर नाराजी व्यक्त केली होती आणि आता आम्ही सरकारच्या मंजुरीची वाट पाहत आहोत, त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ, असे म्हटले होते. दरम्यान, अशीही माहिती आहे की, पाकिस्तानचे एक शिष्टमंडळ प्रथम भारताला भेट देणार असून, त्यात सुरक्षा व्यवस्थेची चाचणी घेतली जाणार आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या आंतर-प्रांतीय समन्वय (क्रीडा) मंत्रालयाच्या अधिकृत सूत्राने सांगितले आहे की 2023 च्या विश्वचषक स्पर्धेसाठी आपला राष्ट्रीय संघ भारतात पाठवण्यापूर्वी एक पाकिस्तानी शिष्टमंडळ भारताला भेट देईल. त्यांनी सांगितले की हे शिष्टमंडळ ज्या स्टेडियममध्ये पाकिस्तानी संघाचे सामने खेळायचे आहेत तेथे जाऊन तेथील सुरक्षा व्यवस्था तपासतील.

मिळालेल्या माहितीनुसार, भारत दौऱ्यावर जाणाऱ्या या शिष्टमंडळाबाबतचा अंतिम निर्णय ईदच्या सुटीनंतर आणि पीसीबीच्या नवीन अध्यक्षांच्या नियुक्तीनंतर घेतला जाऊ शकतो. येत्या आठवडाभरात या प्रकरणी निर्णय होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पाकिस्तानच्या परराष्ट्र आणि अंतर्गत व्यवहार मंत्रालयाशीही सल्लामसलत केली जात आहे.

अधिकाऱ्याने सांगितले की, आमचे सुरक्षा शिष्टमंडळ पीसीबीच्या प्रतिनिधीसोबत पाकिस्तानला वर्ल्ड कपचे सामने खेळवणाऱ्या ठिकाणांची पाहणी करण्यासाठी जाईल. हे शिष्टमंडळ विश्वचषकात त्यांच्या संघासाठी केलेल्या सुरक्षा आणि इतर व्यवस्थेचीही पाहणी करणार आहे. हे शिष्टमंडळ चेन्नईतील चेपॉक, बंगळुरूमधील चिन्नास्वामी, हैदराबादमधील राजीव गांधी, कोलकाता येथील ईडन गार्डन आणि अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमला भेट देऊ शकते.