PM Modi : मणिपूरमधील समस्येवर शांततेतून तोडगा काढणार : नरेंद्र मोदी

PM Modi Speech : – देशाच्या अमृत काळात आपण जे निर्णय घेऊ, जी स्वप्नं बघू, जे कष्ट करू, ते देशाच्या पुढच्या हजार वर्षांची विकासाची दिशा निश्चित करतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला. 77 स्वातंत्र्य दिनानिमित्त नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केल्यानंतर राष्ट्राला संबोधित करताना ते आज बोलत होते. देशवासियांना, माझ्या प्रिय कुटुंबियांनो, अशी साद घालत, देशाच्या विकासाच्या वाटचालीतल्या प्रत्येक घटकाच्या योगदानाची त्यांनी प्रशंसा केली. देशातल्या युवा पिढीवर आपला दृढ विश्वास असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

जनतेचा सरकारवर आणि संपूर्ण जगाचा भारतावर असलेला विश्वास हे भारताचं खरं सामर्थ्य आहे. जी-20समूहाच्या अध्यक्षतेच्या कार्यकाळात भारताच्या विविधतेचं दर्शन संपूर्ण जगाला झालं आहे, जगभरात भारताबद्दलचं आकर्षण वाढत आहे, देश कृषी निर्यात क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहे, असं ते म्हणाले.

भारताची अर्थव्यवस्था आता जगात पाचव्या स्थानी पोहोचली आहे आणि पुढच्या पाच वर्षांत देश जगातली तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. केंद्र सरकारनं गेल्या नऊ वर्षांत राबवलेल्या विविध कल्याणकारी योजनांचा त्यांनी आढावा घेतला. तसंच आगामी काळातल्या काही महत्त्वपूर्ण योजनांची माहिती दिली. देशाच्या विविध क्षेत्रातल्या सामर्थ्याच्या बळावरच 2047 भारत विकसित राष्ट्र म्हणून ठाम उभा राहील असं ते म्हणाले. भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरण ही देशापुढची सर्वात मोठी आव्हानं आहेत आणि या तीन दुर्गुणांच्या विरोधात आपल्याला एकजुटीनं लढावं लागेल असं त्यांनी सांगितलं.

मणिपूरमधल्या अप्रिय घटना थांबवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत; मणिपूर आता शांत होत आहे, असं सांगून संपूर्ण देश मणिपूरच्या पाठीशी उभा असल्याची ग्वाही पंतप्रधानांनी दिली. उत्तरेकडच्या राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या नैसर्गिक आपत्तीबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला. आपल्या भाषणाच्या प्रारंभी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांना त्यांनी आदरांजली अर्पण केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरच्या घटनेचाही भाषणात उल्लेख केला. मणिपूरमध्ये आणि हिंदुस्थानच्या इतरही काही भागात हिंसाचार झाला. आई-बहिणींच्या सन्मानाला धक्का लावण्यात आला. देश मणिपूरसोबत आहेत. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मणिपूरमधील समस्येवर शांततेतून तोडगा काढणार आहे. मणिपूरमध्ये केंद्र आणि राज्य सरकार शांतता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत आणि करत राहतील.