वर्धा जिल्हयातील वंचित, भाजपला खिंडार; दिग्गज नेत्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

मुंबई  – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil, State President of NCP) यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि पक्षाचे प्रदेश संघटक सचिव अभिजीत फाळके (Abhijeet Phalke) यांच्या पुढाकाराने आज वर्धा जिल्ह्यातील इतर पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

वर्धा जिल्ह्यातील पक्ष संघटना बळकट करण्यासाठी आजचा पक्ष प्रवेश अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त करून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. वर्धा जिल्ह्यात ज्यांना जनाधार आहे त्यांना संधी देण्याची आदरणीय शरद पवारसाहेबांची (Sharad Pawar) आणि पक्षाची भूमिका आहे. त्यामुळे नव्या जुन्या सर्व नेत्यांनी एकत्रितपणे पक्ष संघटना बळकटीसाठी पुढाकार घ्यायला हवा असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.

राष्ट्रवादी भवन मुंबई येथे वंचित बहुजन आघाडीचे (Deprived Bahujan Front) विदर्भ समन्वयक रुपचंद टोपले (Rupchand basket), भारतीय विद्यार्थी मोर्चाचे माजी विदर्भ अध्यक्ष महेश मुडे, भाजपा व्यापारी आघाडी वर्धाचे जिल्हाध्यक्ष राकेश मंशानी, आरपीआयचे जिल्हा महासचिव कैलास सेलकर, बसपाचे माजी विधानसभा अध्यक्ष नागसेन थूल तसेच इतर असंख्य पदाधिकार्‍यांनी पक्षात प्रवेश केला.

यावेळी पक्षाचे कोषाध्यक्ष हेमंत टकले (Hemant Takle), प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार जयदेव गायकवाड, आदिवासी सेल विभागाचे प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार राजू तोडसाम, प्रदेश उपाध्यक्ष दिवाकर गमे, सांगली शहराध्यक्ष संजय बजाज तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.